ताज्याघडामोडी

करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; पहिल्याच दिवशी केला धक्कादायक खुलासा

राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत आलेल्या त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘शिवशक्ती सेना’ असं त्यांच्या पक्षाचं नाव असणार आहे. काही मंत्र्यांच्या बायकांनीही माझ्याशी संपर्क केला असून त्यांनी माझ्या पक्ष स्थापनेला पाठिंबा दिला, असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे.

नगरमध्ये ३० जानेवारीला मोठा मेळावा घेऊन पक्षाच्या कामाची सुरुवात करणार असल्याची माहिती करुणा मुंडे यांनी आज नगरमध्ये दिली आहे. वेळ पडलीच तर परळी वैजनाथ मतदारसंघातून पती धनंजय मुंडे यांच्याविरूद्ध निवडणूक लढवण्याचीही तयारी असल्याचे त्या म्हणाल्या.

करुणा मुंडे यांनी आज नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन या नव्या पक्षाची घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणे, गोरगरीबांवरील अन्याय दूर करणे या उद्देशाने या पक्षाची स्थापना करण्यात येत आहे. गेल्या २५ वर्षांपासून आपण अनेक यातना सहन केल्या आहेत.

त्यामुळे आता घराबाहेर पडून पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्या पक्षात सर्वसामान्य जनतेला स्थान असेल. वेळ पडली तर आपण बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ या विधानसभा मतदारसंघातून आपले पती धनंजय मुंडे यांच्याविरुद्धही निवडणूक लढण्यास मागेपुढे पाहणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

पक्षाच्या स्थापनेसंबंधी त्यांनी सांगितले, या पक्षाची अधिकृतपणे स्थापना करण्यासाठी ३० जानेवारी २०२२ रोजी नगरला मोठा मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी लाखोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत तुळजाभवानीचे दर्शन घेऊन संपूर्ण महाराष्ट्राच्या दौरा करणार असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.

‘नव्या पक्षात पतीला स्थान नाही’

करुणा मुंडे पुढे म्हणाले की, ‘मी हा पक्ष जनतेकडून देणगी गोळा करून सुरू करणार आहे. या पक्षात समाजसेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना स्थान असेल. समाजकारण करताना मला सत्तेत असणं गरजेचं वाटलं. त्यामुळे मी स्वतःचा पक्ष स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे. घरात आपण राजकारण पाहिलं आहे. पोलिसांचा वापर कसा होतो मी पाहिलं आहे. सध्या तीन पक्षांचे सरकार आहे.

फक्त पोलिसांना बळी दिलं जातं आहे. याची उदाहरणे परमवीर सिंह, वानखेडे यांना भोगावे लागले आहेत. समीर वानखेडे सारख्या अधिकाऱ्यांना टार्गेट केलं जात आहे. दुसरीकडे अजित पवार, धनंजय मुंडे यांच्याकडे करोडो रुपयांची मालमत्ता असल्याचं बोललं जातं, त्यांच्याबद्दल काहीच होत नाही. त्यामुळे आता मी माझे जीवन जनसेवेसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील जनतेला आवाहन आहे की एकत्र या, मी एक नवी सुरुवात करत आहे. चांगल्या लोकांचा पक्ष काढू, यामध्ये माझ्या पतीलासुद्धा स्थान देणार नाही,’ असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *