Uncategorized

बँकेतील कर्मचाऱ्यानेच घातला खातेदारांना गंडा 

 बँकेच्या कर्मचाऱ्यानेच खातेदारांच्या खात्यातील रक्कमेवर डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमधील  एका बँकेत घडला आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे बँकेतील रक्कमेवर डल्ला मारणाऱ्या कर्मचाऱ्याला एक हात नाही, तो अपंग आहे. तरी देखील त्याने चोरीचं एवढं मोठं धाडस केलं. त्याच्या या कारनाम्यामुळे पोलिसांनी बँकेतून त्याची रवानगी थेट पोलीस ठाण्याच्या कोठडीत केली आहे.

अंबरनाथ पश्चिम भागात स्टेशन परिसरात बँक ऑफ बडोदा या बँकेत सुमित मंगलानी हा क्लार्क म्हणून काम करतो. त्याने आपल्या एका ओळखीच्या खातेदारासह एक योजना आखली. ही योजना होती बँकेतील खात्यामधील रक्कमेवर डल्ला मारण्याची. त्यानुसार नोव्हेंबर 2020 पासून जानेवारी 2021 महिन्यापर्यंत या मंगलाणी यांनी आपल्याच बॅंकेतील 12 खातेदारांच्या खात्यातील रक्कम दुसऱ्या खातेदाराच्या खात्यात वर्ग केले.हे करत असताना त्याने विशेष काळजी घेतली ती म्हणजे त्याने अशी 12 खाती निवडली जी मोबाईल नंबरशी लिंक नाहीत. म्हणजे रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग केल्यास त्याची कोणतीही माहिती खातेदारांना मिळणार नाही. या सर्व खातेदारांची तब्बल 11 लाख 60 हजार 800 रुपये एवढी रक्कम त्याने याच बँकेतल्या खातेदार विजय गुप्ता यांच्या खात्यावर वळती करत केली.

ऑनलाइन पद्धतीने ही रक्कम त्याने दुसऱ्या खात्यात वर्ग केली होती. खातेदार आणि बँकेच्या ही बाब लक्षात आल्यावर बँकेच्या मॅनेजरने अंबरनाथ पोलीस ठाणे गाठत या प्रकरणी तक्रार केली. अंबरनाथ पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तरे,पोलीस नाईक राजवळ,सूर्यवंशी आणि पोलीस हवालदार म्हसे या पथकाने तपास सुरू केला. यावेळी बँकेचा कर्मचारी सुमित मंगलानी आणि खातेदार विजय गुप्ता यांनी संगनमत करून हा अपहार केल्याचे निष्पन्न झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *