ताज्याघडामोडी

निवडणूक सभेत भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गटात राडा, लाथाबुक्क्यांनी मारहाण

कर्नाटकातील आगामी निवडणुकांसाठी भाजपची मंगळवारी बैठक आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीत वातावरण चांगलच तापलं. यावेळी आधी वादावादी झाली. दोन गटांमध्ये जोरदार वादावादी होऊन प्रकरण तुफान हाणामारीपर्यंत गेलं आणि राडा झाला. राज्य उत्पादन शुल्क मंत्री के. गोपालय्या यांनी ही बैठक आयोजित केली होती. डिसेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी हसन जिल्ह्यातील अर्सिकेरे येथे ही बैठक बोलावण्यात आली होती.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांचे माजी सहकारी एन. आर. संतोष हे यावेळी बैठकीत भाषण करत होते. त्यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांच्या एका गटाने आक्षेप घेतला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अर्सिकेरेमधील त्यांच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंत्री गोपालय्या यांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र घोषणाबाजी करणारे कार्यकर्ते ऐकायला तयार नव्हते. यामुळे कार्यक्रमस्थळावरून मंत्र्यांनी काढता पाय घेतला आणि ते निघून गेले. मंत्री निघून जाताच भाजप कार्यकर्त्यांच्या दोन गट वादावादी सुरू झाली. पुढे वादावादीचं रुपांतर मारहाणीत होऊन तुफान राडा झाला. या घटनेच्या व्हिडिओ व्हायरल झाला. एक व्यक्ती दुसऱ्याला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी काही कार्यकर्ते त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

संतोषच्यावर प्रश्न उपस्थित करणारे मोहन नाईक हे या घटनेत जखमी झाले आहेत. त्यांना तेथील स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मोहन नाईक हे हरनहल्ली गटातील कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येतंय. दुसरीकडे, मंत्री आणि संतोष यांनी या घटनेवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसंच आतापर्यंत दोन्ही गटांपैकी कोणीही पोलिसांत तक्रार दाखल केलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *