ताज्याघडामोडी

मतदारांना खुश करण्यासाठी पुढाऱ्याने जेवणावळीच्या पंगती उठवल्या 

भारतीय लोकशाहीने या देशातील जनतेला दिलेले सर्वात मोठे शस्त्र म्हणजे मतदानाचा अधिकार.मात्र मतदानापूर्वीच्या काही दिवस आधी मतदारांना खुश करण्यासाठी पैसे वाटणे,सामिष जेवणावळी उठवणे असे फंडे वापरले जात असल्याचे गेल्या अनेक वर्षांपासून उघड गुपित जगजाहीर आहे.निवडणुकीच्या काळात किंवा निवडणूक जवळ आली कि मतदारांना खुश करण्यासाठी अनेक नेते मंडळी उदार होतात. 
 
मात्र त्या पाठीमागेही काळी बाजू असते हे पुन्हा एकदा पुढे आले.मुंबईत एका कॅटरिंग व्यावसायिकानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यावसायिकानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत खळबळजनक खुलासा केला असून प्रकाश राठोड असं आत्महत्या करणाऱ्या कॅटरिंग व्यावसायिकाचं नाव आहे. ते चेंबर येथील पांजरापोळ परिसरातील रहिवासी आहे. मृत राठोड यांचा कॅटरिंगचा व्यवसाय असून ते देवनार, चेंबूर आणि गोवंडी परिसरात विविध कार्यक्रमासाठी जेवण पुरवण्याचं काम करत होते. 
 
संबंधित परिसरातील काही बड्या राजकीय नेत्यांनी त्यांच्याकडून अनेकदा जेवणाची ऑर्डर घेतली होती. पण जेवणाचे लाखो रुपयाचं बिल संबंधित राजकीय नेत्यांनी थकवलं त्यामुळे आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्या करत असल्याचे मृत्यू पूर्वी लिहलेल्या चिट्ठीतून स्पष्ट झाले आहे.
 
अनेकदा विनवणी करूनही राजकीय नेते पैसे देण्यास टाळाटाळ करत होते. त्यामुळे राजकीय नेत्यांच्या मुजोरीला कंटाळून प्रकाश राठोड यांनी देवनार येथील एका हॉलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच गोवंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, त्यांना प्रकाश राठोड यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली आहे.
 
संबंधित चिठ्ठीत त्यांनी आत्महत्या करण्याचं कारण लिहिलं असून संबंधित देणं बुडवणाऱ्या राजकीय नेत्यांची नावं लिहिली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास गोवंडी पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *