ताज्याघडामोडी

‘इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, तिकडे आदित्य ठाकरेंची स्कॉटलंड वारी’, अतुल भातखळकरांची खोचक टीका

एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरुन राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपचे कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी याच मुद्द्यावरुन पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

स्कॉटलंड देशातील ग्लास्गो येथे आयोजित पर्यावरण बदल परिषदेस (सिओपी-26) कोणतेही अधिकृत निमंत्रण नाही. तरीही राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाच्या नावाखाली निकटच्या अधिकाऱ्यांना सोबत घेत पर्यटन करण्याचे काम चालविले आहे. त्यामुळे “इकडे एसटी कर्मचारी उपाशीपोटी काम करी, अन् आदित्य ठाकरेंची पर्यावरणाच्या नावाखाली विना निमंत्रण जनतेच्या पैशावर स्कॉटलंड वारी” अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.

‘पर्यटन दौऱ्याचा खर्च आदित्य ठाकरेंकडून घ्या’

या परिषदेला केवळ देशाच्या प्रमुखांनाच परवानगी आहे. असं असूनही आदित्य ठाकरे हे कोणत्या अधिकारात ग्लास्गोला गेले होते? त्याचे त्यांना निमंत्रण होते का? राज्यात मागील तीन आठवड्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असताना परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार यांना सहकुटुंब सोबत घेऊन जाण्याचे कारण काय?

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अधिकाऱ्यांचा खर्च जनतेच्या पैशातून का करण्यात आला? एवढा लवाजमा सोबत नेत आदित्य ठाकरे यांनी त्या परिषदेतून महाराष्ट्रासाठी काय आणले? अशी प्रश्नांची सरबत्तीच भातखळकर यांनी केलीय. तसंच या संपूर्ण पर्यटन दौऱ्याचा खर्च हा आदित्य ठाकरे यांच्याकडूनच वसूल करावा, अशी मागणही भातखळकर यांनी ठाकरे सरकारकडे केलीय.

मुंबईसह राज्यातील आठ शहरांना वायू प्रदूषणाचा विळखा पडलेला आहे. अतिविषारी प्रदूषणामुळे दिवसागणिक शेकडो नागरिक आजारी पडत आहेत, असं असतानाही राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे केवळ पर्यटनात मग्न असल्याचा टोलाही भातखळकर यांनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *