एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी गेल्या ६ दिवसापासून संपाचे हत्यार उपसले आहे.या संपास भाजपने पाठींबा व्यक्त केला असून राज्यातील भाजपचे विविध नेते,पक्ष पदाधिकारी हे या संपात सक्रिय सहभागी होत आहेत.मुंबईत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर व आ.सदाभाऊ खोत हे कामगारांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.मात्र याच वेळी महाविकास आघाडीकडून भाजपने या संपाचे राजकारण सुरु केले आहे असा आरोपही केला जात आहे.अशातच आता सोलापूर जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासह सहाजणांनी सोलापूरचे एस.टी.विभाग नियंत्रक राठोड संपात सहभागी होत नाहीत म्हणून त्यांना दमदाटी केली . तर कर्मचाऱ्यांवरील निलंबन मागे घ्या, त्यांना कामावर जाण्याची सक्ती करू नका, असे म्हणून त्यांना कार्यालयातून बाहेर जाण्यास अडथळा आणल्याप्रकरणी विभाग नियंत्रक विलास राठोड (यांनी त्यांच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
या बाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्याशी पंढरी वार्ताच्या वतीने संपर्क केला असता सोलापूर एसटी आगाराचे काही कर्मचारी गेल्या तीन दिवसापासून अन्नत्याग आंदोलन करीत आहेत.यामुळे त्यांच्या प्रकृतीस धोका संभवतो अशातच एसटी कर्मचाऱ्यांवर संप मागे घेण्याबाबत दबाव आणला जात आहे याची माहिती मिळताच आम्ही सोलापूर विभाग प्रमुख राठोड याना भेटण्यासाठी गेलो.यावेळी पुढे गेलेल्या काही महिलांना विलास राठोड यांनी अपमानास्पद वागणूक दिली.त्या बाबत सदर महिला पदाधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता याची माहिती एसटी चे सोलापूर विभाग प्रमुख विलास राठोड यांना मिळाल्याने त्यांनी आमच्या विरोधात खोटी तक्रार दाखल केली असल्याचे सांगितले.
तर एसटी कामगारांच्या आंदोलनास पाठींबा दर्शविण्याससाठी आलेल्या भाजप भटक्या विमुक्त महिला आघाडीच्या अध्यक्षा माया अर्जुन माने यांनीही एसटीचे सोलापूर विभाग नियंत्रक विलास राठोड यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात लेखी तक्रार देत तू इथे कशाला आली आहेस असे म्हणत विलास राठोड यानी केबिनच्या बाहेर हो असे सांगत धक्काबुकी केली असे या तक्रारीत नमूद केले आहे.