ताज्याघडामोडी

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता

शासनामध्ये विलीन करण्यासाठी गेले काही दिवस संप करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब  यांनी मोठा दिलासा दिला आहे. एसटी कामगारांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीचा अभ्यास करून शासन सकारात्मक निर्णय घेईल.

तसेच विलिनीकरणासंदर्भात नेमण्यात आलेल्या समितीला आपला अहवाल लवकर देण्याबाबत सांगण्यात येईल, असे आश्वासन परब यांनी संपकरी एसटी कामगारांच्या शिष्टमंडळाला आज दिले. कर्मचाऱ्यांचे नुकसान होऊ नये अशी आमची भावना आहे, असे सांगत मंत्री परब यांनी कामगारांना संप मागे घेण्याबाबत पुन्हा एकदा आवाहन केले आहे. दरम्यान, शिष्टमंडळाला दिलेल्या आश्वासनावर आ. गोपीचंद पडळकर,आ.सदाभाऊ खोत  यांनीही समाधान व्यक्त केले आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत भाजप आमदार गोपीचंद पडळकर, रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आज एसटी महामंडळाचे अध्यक्ष व मंत्री अनिल परब यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली.

यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्त सल्लागार तथा मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे उपस्थित होते. तर कामगारांच्या शिष्टमंडळात सविता पवार, दिलीप घोडके, शरद कोष्टे, विनीत फडके, सतीश मेटकरी आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

यावेळी पडळकर, खोत यांच्यासह कामगारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यावर परिवहन मंत्री म्हणाले की, कामगार संघटनांच्या मागण्यांनुसार एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता वाढवून दिला आहे. फक्त वेतनवाढीसंदर्भात दिवाळीनंतर चर्चा केली जाणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *