गुन्हे विश्व

धक्कादायक घटना

जळगाव खुर्द येथे जन्मदात्या पित्यानेच आपल्या १६ वर्षीय मुलीवर तीन वर्षांपासून अत्याचार केल्याची घटना उजेडात आली असून   पीडित मुलीने नराधम बापाविरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात  तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणानंतर  या परिसरात खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी नराधम बापास अटक केली आहे.पीडित १६ वर्षीय मुलीच्या आईचे १३ वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. त्यामुळे ती आपले वडील, आत्या व भावासह राहते. लहानपणापासून आत्यानेच या पीडित मुलीचा सांभाळ केला आहे. दरम्यान, पीडितेचा ४१ वर्षीय पिता गेल्या तीन वर्षांपासून आपल्या मुलीवर अत्याचार करीत होता. याबाबत कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली जात होती, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

शनिवारी (ता. २३) पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान पीडितेवर पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने पीडितेने विरोध करीत बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले व पोलिसांकडे आपल्यावर घडलेली आपबिती सादर केली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी पीडितेचे म्हणणे ऐकून घेत तातडीने गुन्हा दाखल करून संशयितास अटक केली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व निरीक्षक भागवत यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मंगेश गोंटला, गजानन वाघ तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *