गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पतीला निलंबित केल्यानंतर महिलेचा जिल्हा परिषदेच्या कार्यालयात जोरदार राडा

पतीला निलंबित केल्याने पत्नीने सीईओंच्या दालनात गोंधळ घातल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. जिल्हा परिषद सदस्य व नागरिकांच्या आलेल्या तक्रारीवरुन प्रशासनाने एका औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी संबंधित औषध निर्माण अधिकाऱ्याच्या पत्नीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात गोंधळ घातला. त्यामुळे काही काळ जिल्हा परिषदेमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सदर अधिकारी कोरेगाव तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी म्हणून काम करत होता. या कर्मचाऱ्याबाबत जिल्हा परिषद सदस्य व नागरिकांच्या तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार आरोग्य विभागाने औषध निर्माण अधिकाऱ्याला निलंबित केलं.

आरोग्य विभागाने केलेल्या या कारवाईचा जाब विचारण्यासाठी अधिकाऱ्याच्या पत्नीने जिल्हा परिषदेमध्ये धाव घेतली. महिलेने मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या दालनात गोंधळ घातला. विविध प्रश्नांची सरबत्ती करत तिने गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी सदर महिलेस शांत राहण्याची सूचना जि. प. सदस्या अर्चना देशमुख, सुरक्षा रक्षक व अन्य कर्मचाऱ्यांनी केली.

मात्र महिला ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.सीईओंच्या सुरक्षा रक्षकाने शहर पोलीस ठाण्यात फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तात्काळ झेडपीत महिला पोलीस कर्मचारी दाखल झाल्या. संबंधित महिलेला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेवून तुमची काय तक्रार आहे ते त्यांच्याकडे द्या, असं सांगितलं. तरीही ती महिला दालनाबाहेर बराच वेळ थांबली होती.

अखेरीस अन्य कर्मचाऱ्यांनी महिलेची समजूत काढत आरोग्य विभागात जाण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ती महिला आरोग्य विभागात गेली. या सर्व प्रकारामुळे जिल्हा परिषदेमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *