ताज्याघडामोडी

जोडप्यांना कागदपत्रांशिवाय प्रवेश देणाऱ्या लॉजचालकांवर कारवाई होणार

पुणे शहरातील बहुतांश लॉजधारकांकडून जोडप्यांना कागदपत्रांशिवाय प्रवेश दिला जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्याशिवाय मुला-मुलीचे वयाबाबत कोणत्याही बाबींची खातरजमा न करता अवैध प्रकार होत असल्याचे दिसून आले आहे.

त्यामुळे संबंधित लॉज मालकांची खैर केली जाणार. त्यासंदर्भात काम सुरू असून लवकर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिला आहे.

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. विशेषतः लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते. मात्र, यासंदर्भात संबंधित लॉजधारकाने खातरजमा न करता आरोपींना प्रवेश दिल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून कठोर उपाययोजना राबविण्यासाठी मास्टर प्लॅन तयार केला आहे.

शहरातील अवैध लॉज धारकांची यादी बनविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. विविध भागातील सर्रास लॉजधारकांकडून अनेकांना कागदपत्रांशिवाय प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे गुन्हेगारीच्या घटनांचे पेव फुटल्याचे दिसून आले आहे. त्यानुसार लॉजचा बेकायदेशीररित्या गैरवापर करणाऱ्या मालकांना दणका देण्यात येणार आहे.

रिक्षाचालकही पोलिसांच्या रडारवर

प्रवाशांनी ने आण करताना महिलांसह मुलींच्या छेडछाडीच्या पार्श्वभूमीवर रिक्षाचालकही पोलिसांच्या रडारवर आले आहेत. विशेषतः स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर, हडपसर, कात्रज, बाणेर, विश्रांतवाडी, विमानतळ परिसरातील रिक्षाचालकांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. ड्रेस, बॅच, बिल्ला नसणाऱ्यांविरूद्ध थेट कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

दरम्यान, सर्वाधिक वर्दळ असलेल्या पुणे स्टेशन, स्वागरेट, शिवाजीनगर परिसरात रात्री अपरात्री मुलींसह महिलांची छेडछाड होण्याची शक्यता जास्त असल्यामुळे बीट मार्शल, पेट्रोलिंग, महिलांच्या पथकांनाही सूचित करण्यात आले आहे.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्याने खबरदारी घेण्याच्या सूचना प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय रात्री-अपरात्री प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पुणे शहर पहिल्यासारखेच सुरक्षित असल्याचे दाखवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *