ताज्याघडामोडी

‘आठ वर्षांपूर्वी माझा मृत्यू झाला होता, आता पुनर्जन्म’, आई-वडिलांना शोधत मुलगा थेट घरी पोहोचला

हिंदी चित्रपटांमधून आपण पुनर्जन्माच्या कित्येक गोष्टी पाहिल्या आहेत. व्हिलनने हत्या केल्यानंतर पुनर्जन्म घेऊन हीरो आपला सूड उगवतो, अशा आशयाच्या कित्येक स्टोरीज आहेत.

पण खरोखरच असा पुनर्जन्म होणं शक्य आहे का? उत्तर प्रदेशातल्या मैनपुरीमध्ये एका मुलाने आपला पुनर्जन्म झाल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही, तर त्याने गेल्या जन्मातील आपले आई-वडील, बहीण, गाव आणि शाळाही ओळखून दाखवली आहे. या प्रकारामुळे हा मुलगा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. मैनपुरी जिल्ह्यातील नगला सलेही गावातील एका लहान मुलाचा आठ वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. प्रमोद कुमार श्रीवास्तव यांचा 13 वर्षांचा मुलगा रोहित कुमार याचा 4 मे 2013 रोजी पाण्यात बुडल्यामुळे दुर्दैवी अंत झाला होता. त्यानंतर प्रमोद कुमार आणि त्यांची पत्नी उषा देवी या आपल्या मुलीसोबत राहत होते. या घटनेच्या आठ वर्षांनंतर, शेजारच्या गावातील एक मुलगा अचानक नगला सलेही गावात आला. गावात आल्यानंतर थेट श्रीवास्तव यांच्या घरी जात, त्याने आपण रोहित कुमार असल्याचा दावा केला. चंद्रवीर उर्फ छोटू असं या मुलाचं या जन्मातलं नाव आहे. आपण गेल्या जन्मी रोहित होतो, आता आपला पुनर्जन्म झाला आहे, असं चंद्रवीरचं म्हणणं होतं.

नगला अमर सिंह गावात राहणारा चंद्रवीर लहानपणापासूनच आपला पुनर्जन्म झाल्याचं घरच्यांना सांगत असे. त्याचे वडील रामनरेश शंखवार यांनी सांगितलं, की छोटूने यापूर्वीही बऱ्याच वेळा नगला सलेही गावात येण्यासाठी हट्ट धरला होता. मात्र, आपला मुलगा आपल्यापासून दुरावला जाईल, म्हणून ते याकडे दुर्लक्ष करत होते. अखेर, छोटूचा हट्ट जिंकला, आणि 19 ऑगस्ट 2021 ला ते छोटूला घेऊन नगला सलेही गावात आले.

गावात आल्यानंतर चंद्रवीरने थेट रोहित कुमारचं घर गाठत, रोहितच्या आई-वडिलांची आणि बहिणीची भेट घेतली. त्यांना भेटून तो आपल्या पूर्वजन्मातील गोष्टी सांगू लागला. हे बघून गावातील लोकही त्यांच्या घराबाहेर जमले, आणि इतर गोष्टींबाबत विचारणा करू लागले. यादरम्यान, गावातील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाषचंद्र यादवही तिथून जात होते. चंद्रवीरने त्यांनाही अचूकपणे ओळखून त्यांच्या पाया पडला. हे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. यानंतर लोक त्याला रोहित कुमारच्या शाळेतही घेऊन गेले. तिथेही त्याने बरोबर सांगितले, की गेल्या जन्मी तो कोणत्या वर्गात शिकत होता. सध्या चंद्रवीर सांगत असलेले किस्से ऐकण्यासाठी गावकरी गर्दी करत आहेत. त्याच्या पुनर्जन्माची कथा आजूबाजूच्या गावांमध्येही चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *