ताज्याघडामोडी

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यावर भर द्या अप्पर जिल्हाधिकारी  संजीव जाधव यांच्या सूचना

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चाचण्यावर भर द्या

अप्पर जिल्हाधिकारी  संजीव जाधव यांच्या सूचना

पंढरपूर दि. 19 :-  तालुक्यातील  कोरोना संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी चाचण्यांमध्ये भरीव वाढ करावी. जेणेकरुन  वेळेत रुग्णांचे निदान होऊन त्यांच्यावर योग्य उपचार करता येईल. त्यासोबत बाधीत रुग्णांपासून होणारा संसर्ग वेळेत रोखता येईल. यासाठी शहरी व ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढवा, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी दिल्या.

तालुक्यातील कोरोना संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेबाबत शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे बैठक  घेण्यात आली. बैठकीस प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी अरविंद माळी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविद गिराम आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. जाधव म्हणाले,  तालुक्यात कोरोचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत, कोरोना चाचण्यावर प्रामुख्याने भर देण्यात येत असून ज्या गावांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. त्या गावामधील सर्वच नागरिकांच्या चाचण्या कराव्यात. कोरोनाबाधित रुग्णांना कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटलमध्येच उपचार करावेत. होम आयसोलेशनमधील रुग्णांना स्वतंत्र्य व्यवस्था असेल तरच ठेवावे.  रुग्णालयात नातेवाईकांची  गर्दी  होणार नाही याची दक्षता घ्यावी. रुग्णांबरोबर एकच नातेवाईक राहील याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे त्यांचीही  दर तीन दिवसांनी  कोरोना चाचणी  करावी.  रुणांना औषधे रुग्णालयातच उपलब्ध होतील, अशी व्यवस्था संबधित रुग्णालयांनी करावी.

तसेच संचारबंदीच्या कालावधीत विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, अशा सूचनाही श्री. जाधव यांनी यावेळी दिल्या.

तालुक्यातील नागरिकांनी कोरोना चाचण्या करण्यासाठी कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता मोठ्या संख्येने पुढे येणे गरजेचे आहे. जेणेकरुन वेळीच संसर्ग रोखणे आणि वेळेत उपचार घेणे शक्य होईल. कोरोना चाचण्यासाठी पुढे येण्याच्या दृष्टीने ग्रामस्तरीय समिती व लोकप्रतिनिधी यांनी आवाहन करावे, असे श्री गुरव यांनी सांगितले.

यावेळी तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये  286 रुग्ण  असून, डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर व  डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 197 रुग्ण उपचार घेत आहेत. तर जिल्ह्यातील 54 रुग्ण उपचार घेत आहेत. होम आयसोलेशनमध्ये 192 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती  डॉ. बोधले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *