पंढरपूरमध्ये निवेदन स्विकृती कक्षाची स्थापना
विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती
पंढरपूर, दि. 18 :- राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा करण्यासाठी पंढरपूर येथे येणार आहेत. यात्रा कालावधीत विविध संघटना, सामाजिक संस्था तसेच नागरिक आदींना मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यासाठी निवेदन स्विकृती कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती केली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
कोरोना ससंर्गाच्या पार्श्वभूमीवर आषाढी यात्रा कालावधीमध्ये पंढरपूर शहरासह लगतच्या गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यात्रा कालावधीत विविध संघटनेच्या मागण्याबाबत बेकायदेशीर जमाव होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय, नवीन कराड नाका, पंढरपूर येथे निवेदन स्विकृती कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नायब तहसीलदार एस.पी.तिटकारे व सहाय्यक कार्यकारी दंडाधिकारी म्हणून एस.बी.साठे यांची नेमणूक केली आहे.
अधिक माहितीसाठी 993002326 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रांताधिकारी श्री.ढोले व तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांनी केले आहे.