ताज्याघडामोडी

गरिबी त्यात लॉकडाऊनमुळे बेकारी घराचे लाईटबील भरणार तरी कसे ?

इचलकरंजीत  गणेशनगर परिसरात वास्तव्यास असलेल्या विशाल नावाच्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. विशालच्या घराचं गेल्या काही दिवसांचं 8 हजार 200 रुपये वीजबिल थकलं होतं. त्यामुळे महावितरणाचे कर्मचारी त्याच्या घरी आले. त्यांनी विशालच्या घराची वीज कापली. यावेळी विशालने महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना खूप विनवण्या केल्या. त्यामुळे विशाल खूप अस्वस्थ झाला. अखेर त्याने आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवलं.

विशाल गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या परिवसारासह शहरात वास्तव्यास होता. तो यंत्रमाग कामगार म्हणून काम करायचा. लॉकडाऊन काळात विशालच्या हातात काम नव्हते. विशालची घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे तो मिळेल ते काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. तो गेल्या दोन वर्षांपासून मोलमजुरी करून कसंबसं आपल्या परिवाराचे पोट भरायचा.विशालने दुपारी जेवण करून आपल्या राहत्या घरी असणाऱ्या एका खोलीमध्ये आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या खोलीत घरातील एक सदस्य आलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. विशालच्या आई-वडील, पत्नीने टाहो फोडला. त्यांच्या आक्रोशाच्या आवाजाने आजूबाजूचे नागरिक घरात आले. घटनेची माहिती मिळताच शेजारच्यांनाही धक्का बसला. अखेर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विशालच्या कुटुंबियांनी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांना विशालने विनवण्या केल्या. मात्र, तरीही त्यांनी वीज कापली. याबद्दल विशालला खूप राग आला आणि तो नैराश्यात गेला. त्यातूनच त्याने आत्महत्या केली, असा आरोप विशालच्या कुटुंबियांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *