Uncategorized

पंढरपुरातील गुरुकृपा डेअरीसह गणेश दूध विक्री केंद्रावर अन्न विभागाची कारवाई

पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील गुरुकृपा डेअरी तसेच इसबावी येथील  गणेश दुध विक्री या आस्थापनांची तपासणी अन्न विभागाकडून करण्यात आली असता या दोन्ही आस्थापना चालकांकडून  अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत परवाना न घेता विनापरवाना व्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे मानवी जीवन व आरोग्य यांचे सरंक्षण व्हावे यासाठी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील कलम १८ व २९ मधील तरतुदींनुसार वैध परवाना/नोंदणी घेई पर्यंत तसेच तपासणीमध्ये नमूद सार्वजनिक जनहितार्थ स्वच्छतेच्या त्रुटींची पूर्तता करेपर्यंत व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश सहा.आयुक्त अन्न विभाग सोलापूर यांच्याकडून देण्यात आले आहेत.    
     या बाबत अन्न विभाग सोलापूर यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुकृपा डेअरी व गणेश दूध विक्री केंद्राकडून सहा.आयुक्त अन्न विभाग सोलापूर यांच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील कलम ५५ अन्वये कायदेशीर कारवाई करीत रु. २ लाख पर्यंत दंड ठोठावण्यात येईल तसेच परवाना न घेता व्यवसाय केल्यास / सुरू ठेवल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील कलम ६३ अन्वये ६ महिन्यांपर्यंत कारावास व रु. ०५ लाख दंड अशा शिक्षेची तरतूद असलेल्या  कायदेशीर कारवाई सामोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे व पंढरपूर शहरातील या दोन्ही आस्थापना विरोधात विनापरवाना व्यवसाय केल्याबद्दल पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.     

सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत कुचेकर यांच्याकडून सहाय्यक आयुक्त (अन्न). श्री. प्र. मा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत करण्यात आली आहे. सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाईची पावले उचलण्यात येणार आहेत असे आवाहन पुणे विभागाचे सह आयुक्त श्री. शिवाजी देसाई यांनी केले आहे.

पंढरपूर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असल्यामुळे या ठिकाणी अन्न विभागाने खाद्य पदार्थ विक्री आस्थपनाबाबत कायम दक्षता बाळगण्यास प्राधान्य दिले असल्याचे वेळोवेळी झालेल्या कारवायांतून दिसून येते,काही वर्षांपूर्वी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या अन्नछत्राच्या ठिकाणी बासूंदीतून विषबाधा होऊन अनेकांना त्रास झाला होता अशी जोरदार चर्चा झाली होती व या घटनेने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली होती.हि घटना आजही पंढरपूरकर विसरले नाहीत अर्थात खाद्य पदार्थ व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापना चालकांनी अन्न विभागाच्या निर्देशित केलेल्या नियमावलीचे पालन करणे गरजचे असते हे पालन करण्यात कसूर केली तर मोठया रकमेच्या दंडासह तुरुंगवासाची देखील तरतूद आहे.मात्र अनेकवेळा अन्न विभागाकडून कारवाई केली जात असताना या कारवाईस न जुमानता आपले थेट राज्यातील मंत्र्यांशी संबंध आहेत अशी शेखी मिरवत असतात अशी चर्चा असून कारवाईस गंभीरतेने घेतले जात नसल्याने सामान्य जनतेच्या आरोग्यास मात्र धोका उत्पन्न होण्याची शक्यता बळावते.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *