पंढरपूर शहर तालुक्यात नामांकित असलेल्या लोटस इंग्लिश मिडीयम स्कुल येथील एका शिक्षिकेच्या त्रासामुळे आपण आत्महत्या करीत आहोत असा मेसेज शाळेच्या कर्मचाऱ्याच्या व्हाट्स अप ग्रुपवर टाकत गोपाळपूर येथील एक महिला शिक्षिका बेपत्ता झाली असून या बाबत गोपाळपूर येथील सदर महिलेच्या नातेवाईकाने तालुका पोलीस ठाण्यास याची माहिती दिली आहे.व सदर बेपत्ता शिक्षिकेचा शोध घ्यावा अशी विनंती केली आहे.
तालुक्यातील जुन्या कासेगाव रस्त्यावरील लोटस इंग्लिश मिडीयम स्कुल हे पंढरपुर तालुक्यातील एक नामांकित शाळा म्हणून ओळखली जाते.या संस्थेस शासनाकडून कुठलेही अनुदान मिळत नसल्याने संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या मोबदल्यात अनेक कर्मचारी काम करत आहेत.भाजपचे नेते डॉ.बी.पी.रोंगे यांच्या अधिपत्याखालील हि शाळा असल्याने लोटस शाळेस वलय प्राप्त झाले आहे.
राज्यातील अनेक खाजगी शिक्षण संस्थांमध्ये कुठे संस्थापक,संचालक मंडळ आणि कर्मचारी यांच्यातील वाद चर्चेत येतो तर कुठे अशा खाजगी शाळेतील कर्मचाऱ्यामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांमधील अंतरकलहाची चर्चा विविध घटनांमुळे होते.तर काही प्रकरणामध्ये शिक्षण संस्था चालकच एखाद्या कर्मचाऱ्यास त्रास देण्यासाठी प्रोत्साहन देतात असेही आढळून आले आहे.
गोपाळपूर येथील सदर शिक्षिकेस नक्की कशामुळे त्रास दिला जात होता हेही स्पष्ट होणे गरजेचे झाले आहे.सदर महिला शिक्षिका सद्या तरी बेपत्ता असल्याचे नमूद करण्यात आले असले तरी व्हाट्स अप ग्रुपवर मेसेज केल्याप्रमाणे सदर महिलेने आपल्या जीवाचे काही बरेवाईट केले नसावे ना अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.