जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी आणि महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सध्या महसूल विभागाकडून सुरू आहे. जिल्ह्यात महापुरामुळे बाधित झालेल्या ११३ गावांमधील १६ हजार ८७९ कुटुंबांचे पंचनामे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर, तातडीची मदत म्हणून लवकरच पूरग्रस्त कुटुंबांच्या बँक खात्यात दहा हजार रुपयांची रक्कम जमा करण्यास सुरुवात होणार आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी ही माहिती दिली. सांगली जिल्ह्यात महापूर आणि अतिवृष्टीमुळे मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यातील ११३ गावे बाधित झाली आहेत. महापालिका क्षेत्र व ग्रामीण भागातील एकूण ४५ हजार ३५२ कुटुंबं बाधित झाली आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील कुटुंबं, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे वेगानं करण्यात येत आहेत. आजपर्यंत १६ हजार ८७९ कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामध्ये पूर्ण नष्ट झालेली कच्ची घरे २७९, पक्की घरे ८, अशंत: नष्ट झालेली कच्ची घरे १ हजार ७८, पक्की घरे ३२०, नुकसान झालेल्या झोपड्या ३४ व गोठे ६१९ आहेत. अजूनही पंचनामे सुरू आहेत, असं चौधरी यांनी सांगितलं.
