ताज्याघडामोडी

फेरफार नोंदीसाठी महिला वकिलास १० हजार लाचेची मागणी 

वारसाची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी दहा हजाराच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती आठ हजाराची लाच खासगी व्यक्ती मार्फत घेतल्याप्रकरणी तलाठ्यासह दोघांना लाचलुपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले.

राजेश उत्तम गायकवाड (वय40, तलाठी सजा पळसदेव) आणि खासगी व्यक्ती संग्राम नथु भगत (वय.40) अशी दोघांची नावे आहेत. याप्रकरणी, कोथरुड पोलिस ठाण्यात दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका वकिल महिलेने तक्रार दिली आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या वकिल असून, त्यांच्या अशिलाच्या वारशाची नोंद करून सातबारा उतारा देण्यासाठी तलाठी गायकवाड याने दहा हजाराच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती आठ हजार रुपयात काम करण्याचे ठरले. याबाबत तक्रारदार महिलेने एसीबीकडे तक्रार केली होती.

दाखल तक्रारीची खातरजमा केली असता, गायकवाड याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त वर्षाराणी पाटील यांच्या पथकाने सापळ रचून आठ हजाराची लाच घेताना संग्राम भगत याला ताब्यात घेतले. खासगी व्यक्तीमार्फत लाच घेतल्याप्रकरणी गायकवाड याला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *