पुणे – मध्यरात्री मद्यप्राशन करताना मित्रांमध्ये वाद झाले. यातून एकाने दुसऱ्याचा खून केला. यानंतर आरोपी दोन दिवस मद्यप्राशन करत होता. तिसऱ्या दिवशी तो खून झालेल्या ठिकाणी गेला. मात्र, रखवालदाराने हटकल्याने त्याने पोलीस स्टेशन गाठत खुनाची कबुली दिली.
राजन रमेश सहानी (27, रा. वारजे नाका) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी किसन प्रकाश वरपा (21, रा. श्रमिक वसाहत, कर्वे रोड) याला अटक केली. ही घटना डेक्कन पोलीस ठाण्यासमोर गरवारे शाळेच्या आवारात घडली आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी सांगितले की, ‘राजन हा पेटिंगचे काम करत होता. किसन काहीही काम करत नाही.
रविवारी दुपारी दोघेही सिंहगडावर गेले. तेथे त्यांनी मद्यप्राशन केले. रात्री उशिरा ते गरवारे शाळेच्या कंपाउंडवरून उडी मारुन आत आले. दुसऱ्या मजल्यावरील व्हरांड्यात त्यांनी पुन्हा मद्यप्राशन केले.
त्यावेळी त्यांच्यात वादावादी झाली. तेथे एक फावडे पडले होते. ते राजनने किसनच्या हातावर मारले. त्यामुळे किसन याने भिंतीवरील फायर सेफ्टीचा लाल डबा राजनच्या डोक्यात मारला. वर्मी घाव बसल्याने राजन जागेवरच निपचित पडला. त्यानंतर किसनने त्याला ओढत वर्गखोलीत नेले. तेथे पुन्हा त्याला दोन-तीन वेळा मारले. तो सकाळ झाल्यावर घरी निघून आला. राजनचा विवाह झाला असून, त्याला दीड वर्षांची मुलगी आहे.