गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

बनावट कागदपत्रांचा वापर करून जप्त केलेल्या कारची विक्री, आरटीओ अधिकाऱ्यांसह 12 जणांविरोधात गुन्हा

कर्जाचे हप्ते थकल्याने जप्त केलेल्या कारची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तत्कालीन आरटीओ अधिकाऱ्यांसह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा बारा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात खोटी तक्रार देऊन एपीएमसी पोलिसांचीदेखील फसवणूक करण्यात आली आहे.

वाशी आरटीओचे तत्कालीन अधिकारी दशरथ वाघुले, राजेंद्र सावंत यांच्यासह कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेड व रिलायन्स जनरल इन्शुरन्स ठाणे शाखेचे अधिकारी, अशा १२ जणांविरोधात सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनी संगनमत करून जप्तीतल्या कारची परस्पर विक्री केल्याचा आरोप सीवूड येथील बाळासाहेब चलर यांनी केला आहे. चलर यांनी २०१३ मध्ये २६ लाखांची कार खरेदी केली होती. त्यासाठी एचडीएफसीमधून २२ लाखांचे कर्ज काढले होते. काही महिन्यांतच हे कर्ज त्यांनी कोटक महिंद्रा प्राइम लिमिटेडमध्ये वर्ग केले होते. २०१६ मध्ये व्यवसायातील तोट्यामुळे त्यांचे काही हप्ते थकले होते. त्यामुळे कोटक महिंद्राच्या रिकव्हरी एजंटने कोणतीही पूर्वसूचना न देता कार जप्त केली. त्यानंतर एक महिन्याने त्यांना ७ लाख ६६ हजार भरून कार घेऊन जाण्यास सांगण्यात आले. शिवाय तडजोड करून त्यांना ४ लाख २५ हजार भरण्यास सांगण्यात आले.

 

यानुसार पुढील काही महिन्यात चलर यांनी पूर्ण रक्कम भरूनदेखील त्यांना कारचा ताबा देण्यास टाळाटाळ सुरू होती. अखेर त्यांनी वाशी आरटीओमध्ये चौकशी केली असता त्यांच्या कारचा बाजारभाव १८ लाख असतानाही १२ लाखाला विकली असल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी सदर कार ट्रान्सफर होऊ नये यासाठी आरटीओला पत्र दिले. त्यानंतरही सदर कार विजय गारोडकर याच्या नावे ट्रान्सफर करण्यात आली. त्यासाठी कोटक महिंद्रा यांच्याकडून आरटीओकडे कोरी एनओसी जमा करण्यात आली होती; परंतु गाडीची मूळ कागदपत्रे चलर यांच्याकडेच असताना गाडी दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर कशी ट्रान्सफर झाली याबाबत आरटीओकडे चौकशी करूनही त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता.

पोलिसांचीही फसवणूक

-चलर यांनी एपीएमसी पोलीस ठाण्यातल्या नोंदी तपासल्या असता, गाडीचे आरसी बुक व इतर कागदपत्रे आरटीओमधून गहाळ झाल्याची खोटी तक्रार दिल्याचे समोर आले.

-गाडीची सर्व कागदपत्रे चलर यांच्याकडे असताना ती आरटीओमध्ये जमा असून, गहाळ झाली असल्याची खोटी तक्रार देण्यात आली होती. यावरून गाडीच्या विक्रीसाठी खोटी तक्रार देऊन पोलिसांचीही फसवणूक केल्याचे समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *