गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

एचआरसीटी स्कोअर १६, ऑक्सिजन लेव्हल ८८.. अन् बेड रिकामा करण्यासाठी दिला डिस्चार्ज

बीड : एचआरसीटी स्कोअर १६, ऑक्सिजन लेव्हल ८८ असतानाही तसेच उपचार बाकी असतानाही केवळ बेड रिकामा करण्यासाठी घाई गडबडीत एका रूग्णाला डिस्चार्ज देण्याचा प्रकार जिल्हा रूग्णालयात झाला आहे. नातेवाईकांनी तक्रार करताच हा डिस्चार्ज रद्द करून पुढील उपचार चालू ठेवण्यात आले. परंतू या निमित्ताने जिल्हा रूग्णालयातील गलथान कारभार आणि जिल्हा शल्य चिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांचे ढिसाळ नियोजन चव्हाट्यावर आले आहे.

वडवणी तालुक्यातील एक रूग्ण जिल्हा रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये १८ मे रोजी दाखल झाला. १९ तारखेपासून त्याला रेमडेसिवीर इंजेक्शन व इतर उपचार सुरू करण्यात आले.

आरोग्य विभागावर विश्वास ठेवून नातेवाईक बाहेर थांबले. परंतू आतमध्ये ऑक्सिजन बंद पडले तरी नर्स व इतर कर्मचारी लक्ष देत नसल्याचे उघड झाले होते. यात दोन नर्सवर निलंबणाची कारवाईही झाली होती. त्यानंतर याच रूग्णाचा २१ मे रोजी एचआरसीटी तपासणी केली असता स्कोअर १६ आला. तसेच ऑक्सिजन लेव्हलही कमी जास्त होती. उपचारही सुरूच होते. असे असतानाच रविवारी रात्रीच्या सुमारास बेड रिकामा करायचा म्हणून याच रूग्णाला चक्क डिस्चार्ज देण्यात आला. नातेवाईकांनी हा प्रकार वरिष्ठांना सांगितल्यानंतर डॉ.अशोक हुबेकर यांनी धाव घेत हा डिस्चार्ज रद्द केला. हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनाही कळविण्यात आला. त्यानंतर आरोग्य यंत्रणेची धावपळ उडाली.

९ वाजता इंजेक्शनचा पाचवा डोस

याच रूग्णाला साधारण ७ वाजेच्या सुमारास डिस्चार्ज झाल्याचे सांगण्यात आले. वास्वतिक याच रूग्णाचा रेमडेसिवीरचा इंजेक्शनचा पाचवा डोस बाकी होता. तो डिस्चार्ज रद्द केल्यानंतर ९ वाजता देण्यात आला. जर ७ वाजताच रूग्णाला सुटी दिली असती तर या इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याशिवाय राहिला नसता, असा संशय व्यक्त होत आहे.

सीएस, एसीएसचा निष्क्रीय कारभार

जिल्हा रूग्णालयात सुविधा आणि उपचाराविना रूग्णांचे हाल होत असल्याचे अनेक प्रकरणांवरून समोर आले आहे. असे असले तरी सीएस व एसीएसला काहीच देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. रोज शेकडो तक्रारी प्राप्त होऊनही यात सुधारणा होत नसल्याचे दिसते. या दोन्ही निष्क्रीय अधिकाऱ्यांमुळे आता संताप व्यक्त होत असून थेट मुख्यमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याचे सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *