गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतर डॉक्टरला मारहाण, हॉस्पिटलची तोडफोड; गुन्हा दाखल

कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड करत डॉक्टरांनाही मारहाण केली. नगरमधील तारकपूरच्या सिटी केअर हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंकज तानाजी गडाख आणि रोहन बाबासाहेब पवार (दोघेही रा. टाकळीकाझी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी डॉ. राहुल अरुण ठोकळ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

तानाजी नारायण गडाख (वय 72) हे 8 मे रोजी कोरोना उपचारासाठी सिटीकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. ऑक्सिजन मास्क हाताने ते काढत असल्याने त्यांच्याजवळ एका नातेवाईकाला थांबण्याची परवानगी दिली होती.

आयसीयूत इतर पेशंट तपासत असताना तानाजी गडाख यांनी ऑक्सिजन मास्क काढून टाकला. ब्रदर प्रवीण गायकर यांनी तो परत लावला. मात्र, याकाळात ते बेशुद्ध झाले. याबाबत नातेवाईकांना लेखी व तोंडी कळविले. मध्यरात्री तानाजी गडाख यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मुलगा पंकज, रोहन यांनी डॉक्टर ठोकळ व कर्मचाऱयांना मारहाण केली. घटनेची माहिती समजताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पंकज गडाख आणि रोहन पवार या दोघांनी हॉस्पिटलची तोडफोड केली, शिवीगाळ करत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघांविरोधात हॉस्पिटलच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी वैद्यकीय कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

आयसीयूतून ओढत आणले

पंकज आणि रोहन या दोघांनी डॉ. ठोकळ यांना ओपीडीत मारहाण केली. त्यानंतर डॉ. ठोकळ दुसरे पेशंट तपासणीला आयसीयूत गेले. रोहन पवार याने आयसीयूतून डॉ. ठोकळ यांना ओढत पुन्हा ओपीडीत आणून त्यांना परत मारहाण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *