गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

इन्कमटॅक्स अधिकाऱ्याच्या नावाने राज्यभरात घातला गंडा; आंतरराज्य गुन्हेगाराला अटक

इन्कमटॅक्स अधिकारी बोलत असल्याचा फोन करून राज्यभरातील व्यावसायिकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्य खंडणीखोराला खंडणी विरोधी युनीट दोनने अटक केली. त्याने मुंबई, नवी मुंबई, कोल्हापूरमधील व्यावसायिकांना इन्कमटॅक्स अधिकारी आणि फूड ऑफिसर असल्याचे सांगत फसवणूक केली आहे. त्याच्याविरूद्ध अंधेरी, बंगलोर, चेंबूर, लष्कर पोलीस ठाण्यातंर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. राहुल किरण सराटे (रा. चेंबुर इस्ट, मुंबई) याला अटक करण्यात आली आहे. शशांक पुणेकर (वय 49) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

हडपसरमधील शशांक पुणेकर यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्यांनी एका महिलेला कमी प्रतीचे सोने विकल्याचे सांगत आरोपी राहूलने शशांक यांना फोन करून तुमचे दुकान सील करण्याची ऑर्डर आली आहे असे सांगितले.

दुकानाला सील लावण्याची ऑर्डर रद्द करावयाची असल्यास गुगल पेवर 37 हजार 200 रुपये पाठविण्याचे सांगून फसवणुकीचा प्रयत्न केला होता. तांत्रिक तपासानुसार पथकाने त्याला चेंबूरमधून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने विविध गुन्ह्यांची कबुली दिली आहे.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, विनोद साळुंके, सुरेंद्र जगदाळे, भूषण शेलार, अमोल पिलाणे, प्रदीप शितोळे, चेतन शिरोळकर, प्रवीण पडवळ, शैलेस सुर्वे, सचिन अहिवळे, राहूल उत्तरकर, विजय गुरव, संग्राम शिनगारे, आशा कोळेकर यांच्या पथकाने केली.

महिलांचा आवाज काढून फसवणूक

व्यावसायिकांना आर्थिंक गंडा घालण्यासाठी आरोपीकडून विविध युक्तीचा वापर केला जात होता. विशेषतः महिलांचा आवाज काढून समोरील व्यावसायिकाला फसवणूक करण्यातही तो तरबेज असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने स्वतः महिलांचा आवाज काढून जीएसटी अधिकारी असल्याचे सांगून काही व्यवसायिकांची फसवणूक केली आहे.

आयकर विभागासह अन्न औषध अधिकारी असल्याचा फोन करून आरोपी व्यावसायिकांकडून पैसे घेउन फसवणूक करीत होता. विविध शहरातील अनेकांना त्याने फसविले होते. तपासामध्ये आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

-विजय झंजाड, पोलीस उपनिरीक्षक, खंडणी विरोधी पथक, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *