गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

‘तुला चपलेनं मारलं नाही, तर माझं नाव रणजित नाही’

वर्धा | राज्यात कोरोनाच्या संकटामुळे चिंताजनकपरिस्थिती निर्माण झाली आहे. डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, संपूर्ण आरोग्य यंत्रणा रोज नव्या समस्यांना सामोरे जात आहे. अशातही आरोग्य विभागातील लोकांना नातेवाईकांकडूनही हल्ले आणि असभ्य वागणूक दिल्याच्या घटना समोर येत आहे. मात्र, वर्ध्यात धक्कादायक प्रकार घडला आहे.

माजी मंत्री आणि काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी थेट जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. शिवीगाळ केल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीसअधीक्षकांना तक्रार दिली आहे.

वर्ध्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर हे प्रकरणाला वाचा फुटली. डॉ. डवले यांनी वर्ध्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना या प्रकरणी निवेदन वजा तक्रार दिली आहे. ९ मे रोजी नाचन गाव येथे आरोग्य शिबीर पार पडलं. या शिबिराची छायाचित्र काढून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राजकीय व्हॉट्स अॅपच्या ग्रुपवर टाकली होती. हे फोटो दिसल्यानंतर आमदार कांबळे यांनी फोन केला. फोनवरून घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली.

तसेच जीव मारण्याची धमकी दिली. ‘तुला चप्पलेनं मारणार, तु मला भेट आता. तुला चप्पलेनं मारला नाही, तर माझं नाव रणजित नाही. तुला जर वाटत की कलेक्टर आणि एसपी तुला वाचवणार, तर तुला पोलीस स्टेशनमध्ये मारणार, अशी शिवीगाळ केली. तसेच तालुका अधिकाऱ्यांनाही कांबळे यांनी धमकावले आहे, असं डवले यांनी तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करावा, अशी मागणी डॉ. डवले यांनी केली आहे.

ही घटना समोर आल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग संघटनेनं संताप व्यक्त केला आहे. संघटनेनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं आहे. करोना काळात आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी प्रचंड तणावाखाली काम करत आहेत. अशात आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली आहे.

हे वर्तन चुकीचं असून, संघटना याचा निषेध करते. त्याचबरोबर संबंधित आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करावा व नियमानुसार कारवाई करावी, नसता राज्यातील आरोग्य सेवा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असा विनंती वजा इशारा संघटनेनं दिला आहे. त्यामुळे आता पुढे या प्रकरणात काय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *