ताज्याघडामोडी

रुग्णालयाला कोरोनाने ग्रासलं; 80 जणांना संसर्ग, 27 वर्षे सेवा देणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरचा मृत्यू

नवी दिल्ली, 10 मे : कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि बाकी मेडिकल स्‍टॉफला संसर्ग होण्याच्या आणि अनेकांचा जीव गेल्याच्या बातम्या वारंवार समोर येत आहेत. देशातील अनेक भागातून फ्रंट लाइन वर्कर्सच्या मृत्यूची बातमी येत असते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर ही स्थिती अधिक बिघडली आहे. अनेक रुग्णालयात तर स्टाफचे अनेक सदस्य एकत्रितपणे पॉझिटिव्ह आले आहेत. दिल्लीच्या मधुबन चौकातील सरोज रुग्णालयातदेखील मोठ्या प्रमाणात लोकांना संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे.

गेल्या दीड महिन्यात सरोज रुग्णालयात 80 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यात रुग्णालयातील डॉक्टर, स्टाफ आणि त्यांच्या कुटुंबीयांचा समावेश आहे. यापैकी अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. तर काहींना रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. भरती झालेल्यांपैकी अधिकतर जणांची प्रकृती ठीक आहे. मात्र दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णालयात तब्बल 27 वर्षांपासून सेवा देणारे डॉ. ए.के. रावत यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे.

रुग्णालयांवर वाढतोय ताण

यापूर्वी दिल्लीच्या एम्स, सफदरजंग रुग्णालयासह अनेक खाजगी आणि सरकारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात डॉक्टर, पॅरा मेडिकल स्टाफला कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी अनेकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मेडिकल स्टाफच्या अनेक सदस्यांवर देखील संसर्गामुळे खूप दबाव आहे. अनेक रुग्णालयात स्टाफची कमतरता मोठी समस्या बनली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *