ताज्याघडामोडी

तुटवड्यादरम्यान कॅनॉलमध्ये आढळले हजारो Remdesivir इंजेक्शन

चंदीगढ 07 मे : देशात सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवली जात आहे. या परिस्थितीमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढली असून त्याचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशात आता समोर आलेल्या एका घटनेनं सर्वांनाच विचारात पाडलं आहे. कारण, प्रचंड मागणी असणारे रेमडेसिवीर इंजेक्शन कॅनॉलमध्ये आढळून आले आहेत. यात रेमडेसिवीर आणि चेस्ट इन्फेक्शनच्या इंजेक्शनचा समावेश आहे. यात सरकारला पुरवठा केले जाणारे 1456 इंजेक्शन, 621 रेमडेसिवीर इंजेक्शन आणि 849 विना लेबल इंजेक्शनचा समावेश आहे.

एका वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तानुसार, रेमडेसिवीर इंजेक्शनवर किंमत 5400 रुपये लिहिण्यात आलेली असून निर्मितीची तारीख मार्च 2021 तर अंतिम तारीख नोव्हेंबर 2021 लिहिण्यात आलेली आहे. सेफोपेराजोन इंजेक्शनवर निर्मितीची तारीख एप्रिल 2021 आणि एक्सपायरी डेट मार्च 2023 लिहिली आहे. आश्चर्यचकीत करणारी बाब म्हणजे, या इंजेक्शनवर विक्रीसाठी नाही, केवळ सरकारी पुरवठा असंही लिहिलं आहे. ही घटना पंजाबच्या चमकौर साहिबजवळील भाखरा कॅनॉलमधील आहे. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे, अशात इतक्या मोठ्या संख्येनं इंजेक्शन पाण्यात आढळून आल्यानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

नुकतंच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले, की राज्यात ऑक्सिजन, लस आणि औषधांसोबतच व्हेंटिलेटरचाही मोठा तुटवडा आहे. कारण भारत सरकारकडून देण्यात आलेल्या 809 व्हेंटिलेटरपैकी 108 व्हेंटिलेटर स्थापित करण्यासाठी कोणीही इंजिनिअर नाही. त्यांनी मागील महिन्यापासून याबाबत केंद्राला अनेकदा पत्र लिहिलं आहे. अशातच आता कॅनॉलमध्ये या अत्यावश्यक इंजेक्शन एवढा मोठा साठा आढळणं सरकारचा हलगर्जीपणाच दर्शवत आहे. या इंजेक्शनबाबत बोलताना ड्रग कंट्रोल ऑफिसर तेजिंदर म्हणाले, की प्रथमदर्शनी हे इंजेक्शन नकली असल्याचं जाणवत आहे. कारण यावर लावण्यात आलेले लेबल ओरिजनल इंजेक्शनच्या लेबलपेक्षा वेगळे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *