ताज्याघडामोडी

राज्यातील १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण थांबण्याची शक्यता

मुंबई : 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी राज्यात विकत घेण्यात आलेली कोव्हॅक्सिन लस 45 वर्षावरील नागरिकांना देण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक ठिकाणी 45 वयोगटातील नागरिकांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकार अशा प्रकारचा धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता आहे.

लसीकरणाचा तिसरा टप्पा राज्यात सुरु झाला असून त्यामध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. पण लोकसंख्येच्या प्रमाणात लसी उपलब्ध नसल्याने राज्यात काही ठिकाणीच, कमी प्रमाणात या वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. पण राज्यातील लसीकरणाच्या अभियानासमोर आणखी एक समस्या निर्माण झाली असून अनेक ठिकाणी 45 वर्षावरील नागरिकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस उपलब्ध होत नाही.

यावर आता पर्याय म्हणून राज्य सरकारकडून काही धोरणात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी राज्य सरकारने विकत घेतलेली कोव्हॅक्सिन लस ही 45 वर्षावरील नागरिकांना देण्याची शक्यता आहे.

केंद्राकडून राज्यातील व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी लस उपलब्ध होत नसल्यामुळे लसीकरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या आधी अनेक नागरिकांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात आला आहे. केंद्राकडून कोव्हॅक्सिन लस उपलब्ध होत नसल्यामुळे लसीचा दुसरा डोस देण्यात अडचणी येत आहेत. यावर उपाय म्हणून आता 18 त 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासाठी खरेदी करण्यात आलेल्या कोवॅक्सिनचा डोस 45 वर्षावरील नागरिकांना देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

राज्य सरकार केंद्राकडे भारत बायोटेककडून उत्पादित करण्यात येणाऱ्या कोव्हॅक्सिनची जास्तीची लस राज्याला द्यावी अशी मागणी करणार आहे. राज्यातील नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यासाठी जगभरातील विविध लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांशी संवाद साधण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *