कोरोना हा किरकोळ आजार आहे त्याचा बाऊ केला जातोय असे म्हणणारे काही महाभाग दिसून येतात त्यांचे डोळे उघडतील असा एक दुर्दैवी बळी कोरोनाने घेतला असून मराठमोळे बाॅडीबिल्डर जगदीश लाड यांचे करोनामुळे निधन झाले आहे. अवघ्या 34 व्या वर्षी त्यांनी बडोद्यात जगाचा निरोप घेतला.
नवी मुंबईत राहणारे जगदीश लाड यांनी गेल्या वर्षांपासून बडोद्यात वास्तव्यास होते व तेथे त्यांनी व्यायामशाळा देखील सुरु केली होती. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती.त्यांची प्रकृती गंभीर होत गेली आणि यातच अखेर त्यांचे निधन झाले.
जगदीश लाड यांनी नवी मुंबई महापौर श्री चा किताब जिंकला होता. चार वेळा महाराष्ट्र श्री सुवर्णपदक, तसेच मिस्टर इंडिया स्पर्धेत दोन वेळा सुवर्णपदक जिंकले होते. तसेच मुंबईत झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही त्यांनी कांस्य पदक मिळवले होते.
त्यांच्या निधनाच्या वार्तेनंतर महाराष्ट्र बाॅडिबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दु:ख व्यक्त केले आहे. एक नावाजलेला मराठमोळा बाॅडिबिल्डर अवेळी गेल्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.