गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

11 वर्षांची पोटची पोर अपशकुनी असल्याची अंधश्रद्धा

जळगाव : अल्पवयीन मुलगी अपशकुनी असल्याच्या अंधश्रद्धेतून  आई वडिलांनी केलेल्या छळाने तिचा जीव घेतला. जळगाव शहरात पिंपळा शिवारामध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा तिचे आई-वडील जन्मापासून अनन्वित छळ करत होते. या निर्दयी आई-वडिलांनी मुलीला अन्न-पाणी दिले नाही, तिला आंघोळ न करु दिल्याने तिला शारीरिक व्याधीही जडल्या. अखेर या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मन हेलावून टाकणारी ही घटना जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंप्राळा हुडको भागात घडली आहे.11 वर्षीय बालिकेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी निर्दयी आई-वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

आरोपी पिता व्यवसायाने केमिस्ट आहे. त्याचा एक भाऊ डॉक्टर तर दुसरा वकील आहे. मुलीचा जन्म झाला, त्यावेळी तिच्या आजीचे निधन झाले होते. त्यानंतर 2 वर्षांनी त्याच्या मेडिकल दुकानाला आग लागली. या दोन्ही घटनांमुळे बालिका ही अपशकुनी असल्याचा समज त्याने करुन घेतला होता.

आजी-आजोबांनी नेले, आई-वडिलांनी पुन्हा आणले

तेव्हापासून तिला डांबून ठेवणे, जेवण न देणे, मारहाण करणे अशा प्रकारे तिचा छळ सुरू होता. तिची अवस्था बघवली जात नसल्याने तिच्या आजी-आजोबांनी तिला आजोळी अंमळनेर येथे आणले होते. याठिकाणी ती 2 ते 3 वर्षे राहिली. नंतर भेटण्याच्या बहाण्याने तिला आई-वडिलांनी परत घरी आणले होते. सध्या ती जळगावात पिंप्राळा-हुडकोत आई-वडिलांकडे राहत होती.

बालिकेच्या मृत्यूनंतर परस्पर दफनविधी

मृत्यूनंतर मुलीचा परस्पर दफनविधी करण्यात आला होता. या घटनेनंतर तिच्या मामाने पोलिसात तक्रार केली. त्यानंतर पोलिस तपासात हे सारे प्रकरण समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *