ताज्याघडामोडी

पंढरीतील परिचारक समर्थक आजी,माजी,भावी नगरसेवकांची समाधान आवताडेंच्या मताधिक्यासाठी मोर्चेबांधणी

२५२ पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या झेंडयाखाली मंगळवेढा तालुक्याच्या राजकारणात मोठा प्रभाव असलेले समाधान आवताडे आणि पंढरपूर नगर पालिका,कृषी उत्पन्न बाजार समिती,पंचायत समिती,जिल्हा परिषद आदी माध्यमातून आपले वर्चस्व सिद्ध करत आलेला परिचारक गट प्रथमच एकत्र आले आहेत.२०१४ आणि २०१९ च्या  विधानसभा निवडणुकीत स्व.भालके,समाधान आवताडे आणि परिचारक यांच्यात अतिशय काट्याची टक्कर होताना दिसून आली.या दोन्ही निवडणुकीत परिचारकांना थोडक्या मतांनी पराभव पत्करावा लागला होता.तर या निवडणुकांमध्ये समाधान आवताडे यांना मिळालेली मते निश्चितच लक्षणीय होती.आणि मतांच्या विभागणीचा फायदा स्व.आ.भारत भालके यांना या दोन्ही निवडणुकीत झाला अशीच प्रतिक्रिया परिचारक आणि आवताडे समर्थकांकडून होत आली.

         या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा वर्षांपासून प्रतिक्षेत असलेली दोन प्रभावी उमेद्वारांमधील थेट लढत पाहावयास मिळत असून पक्षाच्या आदेशानुसार समाधान आवताडे यांच्या विजयासाठी आ.प्रशांत परिचारक यांनी मतदार संघ पिंजून काढण्यास सुरुवात केली असतानाच पंढरपूर शहरात प्रत्येक प्रभागातील प्रत्येक बूथवाईज २०१९ च्या मतदानाची आकडेवारी हाती घेऊनच प्रशांत परिचारक हे आपल्या सर्मथक आजी,माजी,भावी नगरसेवकांना सूचना देत आहेत तर शहराच्या विविध प्रभागात वास्तव्यास असलेले परिचारकांच्या अधिपत्याखालील पदाधिकाऱ्यांना आपल्या भागात ‘लक्ष’ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.कुठेही गाफील राहू नका,प्रत्येक मत महत्वाचे समजून संपर्क आणि समन्वय ठेवा अशा सूचनाच युटोपियन शुगरचे चेअरमन उमेश परिचारक यांनी दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.     

      २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पंढरपूर शहरातील इसबावी सह ७७ मतदान केंद्रांपैकी जवळपास 30 मतदान केंद्राच्या मतमोजणीत स्व.सुधाकरपंत परिचारक यांना मताधिक्य मिळाले होते.तर अनेक मतदान मतदान केंद्रनिहाय मतांची आकडेवारी पाहता समाधान आवताडे आणि स्व.सुधाकरपंत परिचारक यांना मिळालेल्या मतांची संख्या हि स्व.भारत भालकेंना मिळालेल्या मतांपेक्षा जास्त असल्याचे दिसून येते.तर शहरातील काही प्रभागाचे प्रतिनिधित्व परिचारक गटाचे नगरसेवक करत असतानाही स्व. भालकेंना मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते आणि या मागील कारणांचा शोध घेऊन ते दुरुस्त करण्यासाठी त्या त्या भागातील परिचारक सर्मथक आजी-माजी नगरसेवक,इच्छुक ‘भावी’ नगरसेवक व प्रमुख पदाधीकारी कामाला लागले आहेत.   

       हि पोटनिवडणूक जशी राज्यातील भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची समजली जात आहे तशीच ती आमदार परिचारक यांच्यासाठीही पक्षनिष्ठा आणि राजकीय वर्चस्वाचाची कसोटी पाहणारी ठरणार आहे.२०१४ आणि २०१९ च्या पोटनिवडणुकीत स्व.भारत भालकेंना विजयासाठी मिळलेले मताधिक्य आणि त्या निवडणुकीत क्रमांक २ व ३ वर राहिलेले परिचारक आणि आवताडे यांनी प्राप्त केलेली मते यांची बेरीज याची चर्चा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील राजकीय विश्लेषणात महत्वाचा मुद्दा म्हणून चर्चिली जात होती.मात्र आता या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मतदार संघातील हे दोन्ही प्रवाह एकत्र आले असून मतदान केंद्र निहाय मतदार संख्या,व्यक्तिगत मतदार आणि अपेक्षित मते यांचे ”गणित’ जुळविण्यासाठी परिचारकांची एक खास ”टीम” योजनाबद्ध रित्या काम करत असल्याचे समजते.     

         एकूणच या निवडणुकीत सध्या प्रचाराचा धुरळा उडत असला तरी शेवटच्या चार दिवसात कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची आखणी आतापासूनच केली जात असल्याची चर्चा होत असतानाच राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे स्वतः ”नियोजनावर” लक्ष ठेवून असल्याचे समजते.                   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *