Uncategorized

पोटनिवडणुकीत नागेश काकांच्या उमेदवारीने धोका कुणाला ?

पंढरपूर नगर पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा विद्यमान नगराध्यक्षा साधना भोसले यांचे पती नागेश भोसले यांनी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते हि निवडणूक लढविणारच असा दावा त्यांचे सर्मथक करताना दिसून येत आहेत तर स्वतः नागेश भोसले यांनी वृत्तवाहिन्यांशी बोलताना स्व.आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाल्याचे सांगत भाजपने आमदार प्रशांत परिचारक यांना उमेदवारी दिली नाही.सर्व कार्यकर्त्यांनी आणि गोरगरिबांनी मला अर्ज भरा असा आग्रह केला त्यामुळे मी अर्ज भरलेला आहे साडेसात वर्षांपासून नगर पालिका आमच्या ताब्यात आहे.या काळात केलेल्या विकास कामांच्या बळावर आपण उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सांगत इंडस्टी आणून गोरगरिबांना काम मिळावे यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले आहे.                                     

पोटनिवडणुकीचे वातावरण तापत असतानाच गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर आपला माणूस नागेश काका अशा आशयाच्या पोस्ट सर्मथकांकडून वारंवार टाकल्या जाऊ लागल्यानंतर भाजपाकडून नागेश भोसले हेच उमेदवार असणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली होती.जननायक अशी प्रतिमा असलेले नागेश भोसले यांचा लोकसंग्रह खूप मोठा असून नगर पालिकेच्या माध्यमातून शहरात करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांकडे नागेश भोसले यांचे वैयक्तिक लक्ष असते याचा अनुभव पंढपुरकरांनी घेतला आहे.गेल्या साडेसात वर्षांपासून पंढरपूर नगर पालिकेचे नागराध्यक्षपद घरात असताना त्यांनी विरोधक आणि सत्ताधारी या दोघांना खुबीने हातळले असल्याचे दिसून येते तर नगर पालिकेच्या कारभारा विरोधात होणारा ”आक्रोश” थोपविण्यातहि ते यशस्वी ठरल्याने विविध राजकीय पक्षाचे काही पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनाचे काही अध्यक्ष नागेश काकांचा शब्द अंतिम समजणारे असल्याचे दिसून आले आहे.     

              पंढरपूर नगर पालिकेवर वीस वर्षांपासून असलेली सत्ता उखडून टाकत स्व.आमदार भारत भालके यांच्या  नेतृत्वाखालील तिर्थक्षेत्र विकास आघडीने २०११ मध्ये झालेल्या पंढरपूर नगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत परिचारक गटाचा पराभव करत बहुमताने सत्ता हस्तगत केली.मात्र २०१३ मध्ये भालके गटाचे तीन नगरसेवक ‘काही कारणाने ” नाराज झाले आणि बंड झाले.परिचारक गटाच्या साधनाताई भोसले या नागराध्यक्षपदी आरूढ  झाल्या.हे सत्तांतर झाल्यानंतर पंढरपूर शहराचा विकास झाला पाहिजे या ध्येयाने माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हे अतिशय तळमळीने प्रत्येक विकास कामाबाबत स्वतः लक्ष घालून तत्पर राहिल्याचे दिसून आले.२०१६ मध्ये झालेल्या पंढरपूर नगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत साधना  नागेश भोसले या भालके गटाच्या संतोष नेहतराव यांचा पराभव करत जवळपास ३ हजार ९०० मतांनी विजयी झाल्या.या निवडणुकीत युवराज पाटील,मुकुंद देवधर,शिवाजी कोळी आदींना मिळालेल्या जवळपास १४ हजार मतांचा मताचा फटका कुणाला बसला आणि फायदा कुणाला झाला याची चर्चा पुढील अनेक वर्षे पंढरपूर शहरात होत राहिली पण नगर पालिकेवरील परिचारक गटाच्या सत्ताकाळात नगर पालिकेच्या कारभाराबाबत नाराज असलेल्या शहरातील मतदारांचा फायदा स्व.आ.भारत भालके यांना २०४ आणि २०१९ च्या निवडणुकीत झाला असल्याचे मत अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसून आले.     

    विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक हे विकासाची दूरदृष्टी असलेले नेते म्हणून ओळखले जातात.पंढरपूर शहराच्या दीर्घकालीन हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या विकास कामाबाबत कुठल्याही राजकीय हितापोटी अथवा भाविनक होऊन तडजोड न करणारा नेता म्हणून आ.प्रशांत परिचारक हे ओळखले जातात.२०१४ ते १९ या महायुती सरकारच्या सत्ताकाळात आ.प्रशांत परिचारक यांनी भाजपचे सहयोगी आमदार या नात्याने केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अब्जावधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला.या पैकी कोट्यवधी रुपयांचा निधी हा नगर पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध विकास कामासाठी मंजुर करण्यात आला होता.या निधीतून शहरात विविध विकास कामांची सुरुवातही नगर पालिकेने केली.आणि आपल्या भागात सुरु झालेल्या विकासकामांमुळे शहर आणि उपनगरातील नागरिकांकडून आ.प्रशांत परिचारक यांचे अभिनंदन करताना दिसत होते.मात्र नागरिकांचा हा आनंद अल्पकाळच टिकला.अनेक ठिकाणी करण्यात येत असलेली कामे हि तकलादू आणि दर्जाहीन असल्याची नागिरकातून होताना दिसू लागली आणि माध्यमातूनही या बाबत टीकेची झोड उठविली जाऊ लागली.आणि याचाच फायदा २०१९ च्या निवडणुकीत पंढरपूर शहरात स्व.आ.भारत भालके यांना झाल्याचा निष्कर्ष २०१९ च्या निवडणुकीत पंढरपूर शहरातून भालकेंना मिळालेल्या मताधिक्यानंतर राजकीय विश्लेषकांनी काढला होता.                   

 आता पुन्हा २०२१ च्या विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.या निवडणुकीत परिचारक गटाने भाजपचे अधिकृत उमेदवार समाधान आवताडे यांना विजयी करण्याचा निर्धार करून कामही सुरु केले आहे.तर समाधान आवताडे यांच्या विजयासाठी परिचारक गटाचे किंगमेकर उमेश परिचारक यांच्यावर मोठी जबाबदारी भाजपने सोपविली आहे अशा वेळी नागेश काकांनी परिचारकांवर अन्याय होत असल्याच्या भावनेने दाखल केलेली अपक्ष उमेदवारी कुणाला धोकायदाक ठरणार कि स्वतः नागेश भोसले हे या निवडणुकीत विजयी होणार याची खुमासदार चर्चा सध्या पंढरपूर शहरात होताना दिसून येत आहे.२०१६ च्या पंढरपूर नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडला जाणार होता आणि त्यावेळी उषा शिवाजी कोळी यांना परिचारक गटाने उमेदवारी दिलेली असतानाही नगराध्यक्ष पदासाठी कट्टर परिचारक समर्थक समजले जाणारे शिवाजी कोळी यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आणि मोठ्या तयारीने हि निवडणूकही लढविली.शिवाजी कोळी यांच्या नागराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा फटका परिचारक गटाला मताधिक्य मिळविण्यात बसला कि संतोष नेहतराव यांचे मते घटण्यात याची चर्चा मात्र पुढील दोन वर्षे शहरात होताना दिसून आली.                          आता विधानसभा पोटनिवडणुकीत अशीच परिस्थिती निर्माण झाली असून नागेश भोसले यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे तर त्यांच्या सुविध्य पत्नी नगराध्यक्षा साधनाताई भोसले या भाजपच्या मंचावर उपस्थित रहात आहेत तर नागेश भोसले हे निवडणूक लढविणारच असा निर्धार व्यक्त करताना दिसून येत आहेत.मराठा आरक्षण आंदोलनावेळी मोलाचे सहकार्य,शहरात कार्यरत असलेल्या विविध पक्षातील काही पदाधिकाऱ्यांशी असलेले स्नेहसंबध,शहरातील काही सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्याशी असलेली मैत्री आणि ‘योग्य जागी योग्य निर्णय घेत वाद मिटविण्याची’ माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले हातोटी यामुळे त्यांचा मोठा लोकसंग्रह असून या बळावरच नागेशकाका विजयी होतील असा विश्वास व्यक्त होत असतानाच मोठ्या चुरशीने होत असलेल्या या पोटनिवडणुकीत नागेशकाकांची उमेदवारी कुणाला धोकादायक ठरणार याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.मात्र नागेश भोसले हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असाही आशावाद  राजकीय गोटातून व्यक्त होत आहे.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *