Uncategorized

समाधान आवताडेंना भाजपाची उमदेवारी,परिचारकांची अग्निपरीक्षा !

२५२ पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाकडून उमेदवारी कोणाला याची चर्चा राजकीय वर्तुळात गेल्या महिनाभरापासून होत असतानाच आज अखेर भाजपाकडून समाधान आवताडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रणात विजय पताका फडकावण्यासाठी परिचारक प्रणित पांडुरंग परिवार आणि आवताडे प्रणीत दामाजी परिवार हातात हात घालून काम करणार असल्याचे दिसून येत आहे.काही दिवसापूर्वी भाजपचे नेते माजी मंत्री बाळ भेगडे यांनी पंढरपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून समाधान आवताडे,आ.प्रशांत परिचारक व अभिजित पाटील हे इच्छुक असल्याचे सांगितले होते.तर पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी दिली होती.आता पक्षाने समाधान आवताडे याना उमेदवारी दिली असून २००९ च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी पक्षात फूट पडू नये म्हणून परिचारक गटाने त्याग केला होता आता भाजपा उमेदवारास तिरंगी लढतीचा फटका बसू नये म्हणून परिचारकांना त्याग करावा  लागत असला तरी यंदाचा त्याग वाया जाणार नाही अशीच अनेक परिचारक सर्मथकांचे  मत आहे.            आ.प्रशांत परिचारक यांचा विधानपरिषद सदस्यत्वाचा आणखी एक वर्षाचा कालावधी बाकी आहे.सध्या ते आमदार आहेत.जर परिचारक यांना भाजपची उमेदवारी दिली तर समाधान आवताडे हे निवडणूक लढविणारच यावर ठाम आहेत.मागील २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अभ्यास केला असता आवताडे आणि परिचारक यांच्यातील मतविभागणी स्व.आ. भालके यांच्यासाठी फायद्याची ठरली होती असा निष्कर्ष भाजपच्या कोअर कमिटीने काढल्याने थेट दोन प्रबळ उमेदवार आमने सामने आले तर आणि मंगळवेढा तालुक्यात स्व.आ. भारत भालके यांच्यापेक्षा केवळ ५ ते ६ हजार कमी मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले समाधान आवताडे याना पंढरपूर शहर आणि २२ गावात २०१४ ला आघाडीवर होते तर २०१९ ला स्व.आ.भालके यांच्यापेक्षा केवळ ५ हजाराच्या आसपास मतांनी पिछाडीवर राहिलेले परिचारक हे एकत्र आले तर या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी होऊ शकतो या विचाराने समाधान आवताडे यांची उमेदवारी भाजपाकडून निश्चित केली गेली आहे.       

           २००९ च्या विधानसभा निडणुकीवेळी परिचारकांनी अशीच पक्षासाठी माघार घेतली होती पण त्यावेळी राष्ट्रवादीचे तात्कालीन उमेदवार विजयसिह मोहिते पाटील हे उमदेवार म्हणून मैदानात होते.त्यावेळी आता पंढरपुरातील घाटांची नावे बदलली जातील इथपासून ते आपल्याला अकलूजच्या दरबारी राजकारणात कोण विचारणार अशा मतमतांतराचा प्रभाव सर्वसामान्य मतदारांवर पडला होता तर मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावचा पाणीप्रश्न आणि या प्रश्नाबाबत तत्कालीन मंत्री ढोबळे आणि जिल्हयाचे तत्कालीन पालकमंत्री विजयसिह मोहिते पाटील यांची अनास्था भोवली होती.तर पंढरपूर शहर तालुक्याच्या राजकारणात परिचारक विरोधी विठ्ठल परिवारास प्रथमच आमदारकीची संधी मिळण्याची शक्यता लक्षात घेत स्व.भालके यांच्या विजयासाठी कार्यकर्ते सक्रिय आणि आक्रमक प्रचार करताना दिसून आले.तर यंदा मालक उमेदवार नाहीत या भावनेने परिचारक सर्मथक काही नगरसेवक आणि काही प्रभावी प्रमुख कार्यकर्ते गाफील राहिले होते.      

    २००९ च्या निवडणुकीत परिचारकांनी राष्ट्रवादी पक्षासाठी त्याग केला खरा पण आघाडी सरकार सत्तेत येऊनही परिचारकांना मात्र डावलले गेले आणि याचीच परिणीती म्हणून आ.प्रशांत परिचारक यांनी भाजपाशी हातमिळवणी केली.पुढे ते भाजपचे सहयोगी आमदार म्हणून विधानपरिषदेत पोहोचले.२०१४ ला राज्यात सत्तांतर होऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि पंढरपूर शहरात नगर पालिकेच्या माध्यमातून प्रस्तावित विविध विकास कामांना अब्जावधी रुपयांचा निधी राज्य सरकार कडून मिळू लागला त्याच बरोबर पंढरपूर तालुका व मंगळवेढा तालुक्यातील अनेक विकास कामांना न्याय देण्याची भूमिका आमदार या नात्याने प्रशांत परिचारक याना सक्षमपणे पार पाडता आली.याची उतराई म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेवर असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे वर्चस्व संपुष्ठात आणण्यात आ.प्रशांत परिचारक यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.आणि त्यामूळेच देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते आ.प्रशांत परिचारक यांचा शब्द मोडत नाहीत असा संदेश सोलापूर जिल्ह्यात गेला.           

     आता २०२१ विधानसभा पोटनिवडणुकीत आ.परिचारक यांची निष्ठा लक्षात घेऊन व विधान परिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदार संघात भाजपच्या झालेल्या पराभवाचे उत्तर समाधान आवताडे यांना विजयी करून विधानसभेत देण्याचा चंग भाजपच्या वरिष्ठानी बांधल्यामुळे परिचारकांना थांबावे लागले असले तरी २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत परिचारकांना पंढरपूर शहरातील ज्या प्रभागातून आणि २२ गावापैकी ज्या गावातून मताधिक्य मिळाले होते तसेच मताधिक्य भाजपचे उमदेवार समाधान आवताडे यांना मिळवून देण्याची अग्नीपरीक्षा परिचारक समर्थकांना या निवडणुकीत दयावी लागणार आहे एवढे निश्चित.आणि जर तसे घडले तर राज्यातील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आ.प्रशांत परिचारक यांना पुन्हा विधानपरिषदेचे आमदार करतील अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.                        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *