ताज्याघडामोडी

लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री ठाकरे पुन्हा बोलले; आता दिला ‘हा’ इशारा

मुंबई: राज्यातील करोना संसर्गाची स्थिती पुन्हा एकदा गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करत आहेत. त्याअनुषंगाने विविध स्तरांवर त्यांच्या आढावा बैठकाही सुरू असून आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज करोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन हॉटेल्स, उपाहारगृहे, मॉल्स संघटनांच्या प्रतिनिधींसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहे यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले आहे.

मुखमंत्र्यांनी बैठकीत लॉकडाऊनबाबत सरकारची भूमिका नव्याने स्पष्ट केली. लॉकडाऊन करून सगळं बंद करणं आम्हालाही नको आहे पण मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, अशा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बजावून सांगितले. आम्हाला कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका. हा शेवटचा इशारा आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करोनाच्या स्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. गुरुवारी राज्यातील जनतेशी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधताना त्यांनी नागरिकांना विनंतीवजा इशारा दिला होता. करोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव फार वाईट आहे. दुसरी लाट झेलत असलेल्या ब्राझीलसारख्या देशांत हाहाकार माजला आहे. या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

आरोग्य व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. अशी वेळ महाराष्ट्रावर येऊ नये, असे वाटत असेल तर नागरिकांनी स्वयंशिस्त व करोनाबाबतच्या त्रिसुत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा लॉकडाऊनला पर्याय उरणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी तशाच प्रकारचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *