Uncategorized

पंढरपूर तालुक्यातील टेंडर प्रक्रियेवरून जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रचंड नाराजी

२ कोटी ८६ लाखांच्या एकत्रित टेंडर प्रक्रियेबाबत तक्रार करणार 

जिल्हा परिषद बांधकाम विभाग पंढरपूर सातत्याने विविध कारणाने वादग्रस्त चर्चेचा केंद्रबिंदू ठरले असून या विभागाच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्यातील विविध गावाअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांच्या निविदा प्रक्रिया राबिवताना अनेकवेळा राजकीय दबावापोटी निर्णय घेतले जातात असा आरोप होत आला आहे.तर मर्जीतील लोकांना नियमबाह्य रित्या व अटीशर्थी मध्ये पळवाटा काढून कामे दिली जात असल्याच्या तक्रारी केल्या जात असल्याचे दिसून येते.मात्र जिल्हा परिषद बांधकाम विभागातील या खाबुगिरीवर आता जिल्हा परिषदेच्या सभेत उपस्थित झाला असून पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील एका रखडलेल्या कामाबाबत जिल्हा परिषद सदस्या शैला गोडसे यांनी नाराजी प्रकट केल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेत जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारी केवळ मर्जीतील लोकांचे टेंडर मंजूर करण्यात स्वारस्य दाखवितात असा आरोप करीत या संपूर्ण प्रकराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली.
         या बाबत पंढरी वार्ताशी बोलताना जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना मर्जीतील लोकांना निविदा प्रकियेत प्राधान्य कसे देता येईल याची काळजी घेतली जात असल्याचे सांगत जे ठेकेदार मर्जीतील नाहीत त्यांची कशा प्रकारे अडवणूक करता येईल व निविदा भरण्यापासून रोखता येईल हे पाहिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
              जिल्हा परिषद बांधकाम विभागाने गत महिन्यात पंढरपूर तालुक्यातील २८ गावाअंतर्गत रस्ते डांबरीकरण,काँक्रीटीकरण,खडीकरण,मुरूमीकरण आदी जवळपास २ कोटी ८६ लाख रुपयांचे एकत्रित टेंडर काढले आहे.वास्तविक पाहता आतापर्यंत प्रत्येक गावनिहाय व कामनिहाय निविदा प्रकिया आता पर्यंत स्वतंत्र राबविली जात होती.आता राबिवला जात असलेला निविदा प्रक्रियेचा हा सारा प्रकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारा आहे असा आरोप जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने यांनी केला असून आपण याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *