ताज्याघडामोडी

 वारकरी सेना, वंचित बहुजन आघाडी विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनावर ठाम

 वारकरी सेना, वंचित बहुजन आघाडी विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनावर ठाम 

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीवर बहिष्कार

पंढरपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात आणि राज्यात सर्व मंदिरे बंद करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने अनलॉक२ मध्ये देशातील मंदिरे उघडण्यास परवानगी दिली होती. महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने मात्र मंदिरे बंद ठेवली. राज्यातील श्री विठ्ठल मंदिरासह सर्व मंदिरे खुली करण्यासाठी विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीने ३१ ऑगस्ट रोजी मंदिर प्रवेश आंदोलन पुकारले. या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी आज सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विश्व वारकरी सेना वंचित बहुजन आघाडी आणि सर्व वारकऱ्यांची बैठक आयोजित केली होती. मात्र मंदिरे सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या हातांमध्ये कोणताच निर्णय नसल्याने वंचित बहुजन आघाडी, विश्व वारकरी सेना, यांच्यासह अनेक वारकरी संघटनांनी या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. आता थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून चर्चा करू अथवा ३१ ऑगस्ट रोजी विठ्ठलाचे दर्शन घेऊ असा पवित्रा विश्व वारकरी सेना, वंचित बहुजन आघाडी ने घेतला आहे. वारकरी संघटनांसह वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाल्याने हे आंदोलन आता चिघळण्याची भीती व्यक्त केली जातेय. मुख्यमंत्र्यांशी चर्चा घडून न आल्यास ३१ ऑगस्ट रोजी एक लाख वारकऱ्यांसोबत विठ्ठलमंदिर सर्वांसाठी खुले करण्याचा इशारा पुन्हा एकदा वारकऱ्यांनी आणि वंचित बहुजन आघाडीने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *