ताज्याघडामोडी

जिल्हयाच्या सीमा ओलांडून देशी-विदेशी दारूची ”आयात” !

जिल्हयाच्या सीमा ओलांडून देशी-विदेशी दारूची ”आयात” !

अवैध दारू तस्करीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर ?  

संसार उध्वस्त करी दारू ,बाटलीस स्पर्श नका करू हि जाहिरात अलीकडे शासनाने बंद केली असली तरी मागील पिढीला दारू पिण्याचे तोटे सांगण्यासाठी शासन वर्षाकाठी लाखो रुपये खर्च करत होते.हि जाहिरात पाहून दूरदर्शन संचासमोर बसलेला महिला वर्ग सुखावत असला तरी  वस्तुस्थिती मात्र त्यांना माहित नव्हती असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत दारू विक्रीची परवानगी असलेली दुकाने सकाळी ६ वाजताच उघडली जात होती आणि रामप्रहरी घरात धिंगाणा करणाऱ्या नवऱ्याला शिव्या देण्याबरोबरच बायका सरकारला शिव्या देऊन आपला राग शांत करू पहात होत्या. 

        पण चीनहुन कोरोना आला आणि त्याने सगळे व्यवसाय उद्योग ठप्प केले.त्यामुळे सरकारी परवानाप्राप्त दारू दुकाने बंद झाली आणि अनेक कष्टकरी कुटूंबातील महिलांनी सुटकेचा निश्वास टाकला.पण घडले उलटेच देशी बंद झाल्यामुळे पंढरपूर शहर व तालुक्यातील देशीप्रेमी फुग्याकडे वळले तर विदेशीप्रेमी ”ड्राय डे बिझनेसमन” यांचा रस्ता धरू लागले.कधी डुप्लिकेट तर कधी अवैध होलसेल दारू विक्रेत्यांशी संधान बांधून शहर तालुक्यातील लिकर माफियांनी या काळात हात धुवून घेतला असला तरी जाळ्यात सापडल्यावर सुटकेचा मार्गही माहित असल्याने हे लिकर माफिया बिनधास्त होते.पंढरपूर शहर तालुक्यात गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत पोलिसांनी काही ठिकाणी कारवाई करून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई देखील केली पण पोलीस कारवाईला कायदेशीर पळवाटेचा आधार घेत जामिनावर सुटून आल्यानंतर देखील हि संधी पुन्हा नाही या विचाराने अनेक लिकर माफिया कायदेशीर कारवाईला दाद नव्हते हेच दिसून आले आहे.    

       ३ जून पासून महाराष्ट्र शासनाने लोकडाऊन बाबत काही नियम अटी शिथिल केल्या असल्यातरी सोलापुर जिल्ह्यात तूर्तास तरी वाईन शॉप व परमिट रूम चालकांनी पार्सल सेवेच्या केलेल्या मागणीला हिरवा कंदील दाखविला नाही.जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयामुळे लिकर माफिया मात्र सुखावले आहेत.अशातच सोलापूर जिल्ह्यालगतच्या काही तालुक्यातून आता अवैध दारू पंढरपूर शहर व तालुक्यात आणली जाऊ लागली असून या साठी या लिकर माफियांनी खास टीम नियुक्त केली असल्याची चर्चा आहे.हे तरुण बिनधास्तपणे दुचाकी अथवा चारचाकीचा वापर करीत इतर जिल्ह्यातून देशी-विदेशी बनवटीची दारू विक्रीसाठी आणत असल्याची चर्चा आहे.या लिकर माफियांकडून या दारूच्या डिलिव्हरी साठी अल्पवयीन मुलांचा कमिशनच्या आमिषाने वापर होत असल्याची चर्चा आहे.पंढरपूर शहरात कुठे कोण अवैध दारू विक्री करत आहे याचा कानोसा पोलीस व उत्पादन शुल्क विभागाने घेतल्यास हि लिकर लॉबी मोडीत काढणे सहज शक्य  आहे, ज्याची माहिती सामान्य जनतेला आहे त्यांचा कानोसा घेणे पोलीस खात्यास कठीण नाही अशीही प्रतिक्रिया सामान्य नागिरक व्यक्त करीत आहेत. 

        पंढरपूर शहरात शासकीय सेवेसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ३० जून पर्यत येथेच मुक्काम करणे सक्तीचे करण्याचा स्तुत्य निर्णय प्रशासनाने नुकताच घेतला आहे.त्याच बरोबर जे खाजगी  वाहन चालक इतर जिल्ह्यात प्रवास करून त्यांनाही कॉरोनटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र दरदिवशी सोलापूर जिल्ह्याच्या सीमा ओलांडून विक्रीसाठी दारू ”आयात” करीत आहेत त्या ”डिलिव्हरी बॉय” ना मात्र हा नियम लागू नाही का ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात थोडा कानोसा घेतला आणि ज्यांची संशयित म्हणून नावे पुढे येत आहेत त्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स व लोकेशन तपासले व ”खबऱ्यांचीच खबर” घेतली तरी रग्गड नफ्यासाठी कायदा धाब्यावर बसवणाऱ्या,डुप्लिकेट दारूची विक्री करून लोकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या लिकर माफियांना धडा शिकविणे कठीण नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही !              

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *