Uncategorized

पोलीस पाटील संघटनेच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री महोदयांसोबत लवकरच बैठक : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आश्वासन

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची दिनांक ०४ जुलै रोजी पंढरपूर येथे पोलीस पाटील संघटनेच्या वतीने भेट घेण्यात आली. या भेटीदरम्यान संघटनेच्या विविध प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांवर सविस्तर चर्चा करून उपमुख्यमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

भेटीदरम्यान पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करणे, सेवानिवृत्तीचे वय आणि पेन्शन योजना, कर्तव्य बजावताना येणाऱ्या अडचणी, तसेच इतर सोयी-सुविधांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.निवेदनाचा स्वीकार केल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

पोलीस पाटलांचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असून, या मागण्यांसंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री महोदयांशी स्वतः चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या प्रलंबित मागण्यांवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि संघटनेचे प्रतिनिधी यांची एक विशेष बैठक आयोजित करण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यावेळी पोलीस पाटील संघटनेचे राज्याचे प्रसिद्धी प्रमुख तौफिक शेख तसेच सोलापूर जिल्हाध्यक्ष नानासाहेब शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनामुळे संपूर्ण राज्यातील पोलीस पाटील बांधवांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.

चौकट ०१

“पोलीस पाटील हा ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलेल.”
– सुनेत्रा अजितदादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *