भाजप आघाडीच्या नगरसेवकांची नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके यांच्याकडे मागणी
पंढरपूर शहरातील यमाई तलावा लगतची सुमारे 3.12 हेक्टर जागा व या जागेवरील शासनानेच टाकलेले पिकनिक स्पॉट चे आरक्षण फेरबदल करून श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीस गोशाळा विस्तारासाठी देण्याबाबत शासनाने नगरपरिषदेला विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतला आहे.
वास्तविक पाहता MRTP act 1966 मधील कलम 37 नुसार आरक्षण उठवताना नगरपरिषदेची सर्वसाधारण सभेची मान्यता घेणे कायदेशीर बंधन आहे. परंतु पंढरपूर नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेची कोणतीही मंजुरी न घेता परस्पर गोशाळेसाठी जागा देण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे या निर्णयामुळे समस्त पंढरपूरकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे
शासनाने नगरपरिषदेच्या परस्पर मंदिर समितीला गोशाळेसाठी जागा देण्याचा घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा म्हणून शहरातील पंढरपूर नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, सामाजिक संस्था व पर्यावरण प्रेमी नागरिक यमाई तलावच्या बचावासाठी मुख्यमंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यमाई तलाव हा शहराचा ऑक्सिजन पार्क आहे भविष्याच्या दृष्टीने या तलावाचे अस्तित्व राहणे आवश्यक आहे तरी वरील सर्व बाबींचा विचार करून तातडीने पंढरपूर नगरपरिषदेचे विशेष सर्वसाधारण बोलविण्यात यावी म्हणून नगराध्यक्ष प्रणितीताई भालके यांच्याकडे गटनेते भागवत बडवे, सुजितकुमार सर्वगोड, नगरसेवक लक्ष्मणराव शिरसट,अमोल डोके,ॲड सुनिल वाळूजकर, विनायक संगीतराव माजी नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, सामाजिक कार्यकर्ते शरद माने यांच्या शिष्टमंडळाने मागणी केली आहे यावेळी नगरसेवक ओंकार जोशी, राहुल शिंदे अक्षय गंगेकर नागेश यादव उपस्थित होते नगराध्यक्ष डॉ प्रणितीताई भालके यांनी समस्त पंढरपूरकरांच्या भावना लक्षात घेऊन आपण केलेल्या मागणीनुसार निश्चितपणाने याबाबत विशेष सर्वसाधारण सभा लवकरच आयोजित केली जाईल असे आश्वासन दिले
यावेळी शिष्ट मंडळाने यमाई तलाव हा ऐतिहासिक वारसा असलेला तलाव असून इंग्रजकालीन काळात (इ.स. 1890 पूर्वी) पंढरपूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आली होती. आजही या तलावाची देखभाल पंढरपूर नगरपरिषदेच्या निधीतून केली जाते. तसेच राज्य सरोवर संवर्धन योजनेअंतर्गत या तलावाचे सुशोभीकरण करून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात आले आहे. येथे वॉकिंग ट्रॅक, तुळशीवृंदावन, तसेच पक्षी निरीक्षणासाठी वॉच टॉवर उभारण्यात आला असून हजारो नागरिक दररोज येथे व्यायाम व विरंगुळ्यासाठी येतात.
पंढरपूर शहरातील हा एकमेव मोठा तलाव असल्याने पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती वाढलेली असून, जिल्हा सत्र न्यायालय देखील येथे आहे. याशिवाय, या तलावावर देशी-विदेशी पक्ष्यांचेही वास्तव्य असते
यापूर्वी नगरपरिषदेकडून मंदिर समितीस गोशाळेसाठी 3 एकर जागा देण्यात आलेली आहे. मात्र, त्या गोशाळेच्या व्यवस्थापनाबाबत अनेक तक्रारी असून, गाईंच्या वासराच्या मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे आणखी जागा देणे योग्य ठरणार नाही उलट ही दिलेली जागा पुन्हा नगर परिषदेकडे काढून घेणे आवश्यक आहे
सध्या मंदिर समितीकडे शहरापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर जवळच अनवली वाखरी, गोपाळपूर, देगाव व पंढरपूर तालुक्यात इतरही मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे. त्या जमिनीवर गोशाळा उभारणे अधिक योग्य संयुक्तिक योग्य ठरणार आहे.यामुळे गोशाळेतील गाई साठी चाऱ्याची सोय होणार आहे तसेच तलाव नजीकच्या क्षेत्रात गोशाळा झाल्यास तलावाचे पाणी व परिसर सुद्धा दूषित होणार असल्याची बाब निदर्शनास आणून दिली
त्यामुळे शासनाने भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या परिसरात पिकनिक स्पॉट, अतिरिक्त पाणीपुरवठा योजना, ऑक्सिजन पार्क व इतर सार्वजनिक सुविधा उभारण्याचे नियोजन केले आहे. यासाठी निधीही मंजूर करण्यात आला असून कामे प्रक्रियेत आहेत.
तसेच शासनानेच नवीन नगर रचना योजनेमध्ये या यमाई तलावातील जागेवर पिकनिक स्पॉट चे रिझर्वेशन ही टाकलेले आहे
वरील सर्व बाबींचा विचार करता, यमाई तलावालगतची जागा गोशाळेसाठी देणे शहराच्या विकासाच्या व नागरिकांच्या हिताविरुद्ध आहे. त्यामुळे सदर दिलेली मंजुरी तात्काळ रद्द करण्याबाबत यापूर्वी जिल्हाधिकारी सोलापूर व प्रांताधिकारी पंढरपूर यांना देखील लेखी तक्रारी अर्ज उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक व शहरातील सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे शासनाने सदरचा निर्णय रद्द न केल्यास समस्त पंढरपूरकर व पर्यावरण प्रेमी च्या वतीने मोर्चाचे नियोजन करण्यात येणार असल्याचे यमाई तलाव बचाव समितीचे प्रमुख व नगरसेवक ॲड सुनिल वाळूजकर यांनी यावेळी नगराध्यक्ष डॉ प्रणितीताई भालके यांना सांगितले त्यावेळी नगराध्यक्ष यांनी लवकरच विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करून हा विषय सभे समोर निर्णयासाठी ठेवण्यात येईल असे आश्वासन दिले






