ताज्याघडामोडी

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या पुढाकारातून मांजरी व बामणी येथे कर्करोग निदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

सांगोला, दि. ९ जून : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील नागरिकांना कर्करोगाचे लवकर निदान व वेळेत उपचाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी कर्करोग निदान व्हॅनद्वारे विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र अकोला अंतर्गत उपकेंद्र मांजरी व बामणी येथे गर्भाशय मुख (सर्व्हायकल), स्तन व मुखाच्या कर्करोग तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण १७१ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून संशयित रुग्णांना पुढील उपचारासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवकते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केलेली ही मोहीम ग्रामीण भागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तो पूर्णपणे उपचारक्षम ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने नियमित आरोग्य तपासणी करून कोणतीही लक्षणे दिसण्याची वाट न पाहता प्रतिबंधात्मक तपासणी करणे गरजेचे आहे.”
ते पुढे म्हणाले, “तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहणे, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी ही कर्करोग प्रतिबंधाची प्रभावी साधने आहेत. शासनाच्या या उपक्रमाचा प्रत्येक पात्र नागरिकाने लाभ घ्यावा.”
शिबिरास जिल्हा सांख्यिकी अधिकारी श्री. हेमंत पवार यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. तसेच तालुका आरोग्य विस्तार अधिकारी श्री मिलिंद सावंत हे ही उपस्थित होते

सकाळी उपकेंद्र मांजरी येथे १०१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४ महिलांमध्ये गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा संशय आढळल्याने पॅप स्मिअर नमुने घेण्यात आले, तर १ व्यक्तीमध्ये मुखाच्या कर्करोगाचा संशय आढळून पुढील बायोप्सीसाठी संदर्भित करण्यात आले.
दुपारच्या सत्रात उपकेंद्र बामणी येथे ७० नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३ महिलांचे पॅप स्मिअर नमुने घेण्यात आले व पुढील वैद्यकीय तपासणीसाठी आवश्यक सल्ला देण्यात आला.
या शिबिरात स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पूजा साळे व डॉ. स्नेहा पुरवार, दंतचिकित्सक डॉ. रुचा वैद्य, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. सी. वाय. महानवार व डॉ. एम. ए. इनामदार यांनी सेवा बजावली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व आरोग्य कर्मचारी व आशा सेविकांनी सक्रिय सहभाग घेतला.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृती निर्माण होत असून, लवकर निदान व वेळेत उपचाराद्वारे कर्करोगामुळे होणारे मृत्यू कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. :::

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *