वसंत देशमुख-प्रमोद देशमुख यांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष
मागील महिन्यात पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद -तालुका पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने प्रथमच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष स्वबळावर बसविण्याइतके बहुमत प्राप्त केले आहे.जिल्हा परिषदेच्या ६८ पैकी ३८ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.मात्र याच वेळी पंढरपूर तालुक्यात भाजपला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले.तर दुसरीकडे पंढरपूर तालुका पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे ८ तर आमदार अभिजित पाटील-भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखालील आघाडीचेही ८ उमेदवार विजयी झाले आहेत.त्यामुळे पंढरपूर पंचायत समितीचा सभापती भाजपचा होणार कि विरोधी आघाडीचा याची मोठी उत्सुकता तालुक्याला लागून राहिली आहे.सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचारावेळी पंढरपूर तालुक्यात कासेगाव,करकंब,रोपळे आदी ठिकाणी घेतलेल्या प्रचार सभेतील भाषणातून भाजपच्या उमेदवारास विजयी करा अन्यथा विकास कामांसाठी निधी कुठून आणणार ? असा सवाल उपस्थित करीत निर्माण झालेल्या नाराजीमुळे एक प्रकारे विरोधकांना बळ दिल्याचीच चर्चा पंढरपूर तालुक्यात झाली.
आता पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती -उपसभापती पदाच्या निवडी १२ मार्च रोजी होणार असतानाच समान संख्याबळ हा कळीचा मुद्दा ठरला आहे.आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांनी एकत्र येत तालुका पंचायत समितीचे ७ सदस्य विजयी करण्यात महत्वपूर्ण भुमीका बजावली.तर कासेगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार शुभारंभ सभेस आमदार अभिजित पाटील हे उपस्थित राहिले खरे पण कासेगाव जिल्हा परिषद गटातील भालकेंची प्रबळ दावेदारी,भगीरथ भालकेंची साथ मिळाल्याने वाखरी,भोसे,रोपळे जिल्हा परिषद गटातील सोपा होणार विजय लक्षात घेत आमदार अभिजित पाटील यांनी पुढे कासेगाव गटात अलिप्त भूमिका घेतल्याचेच म्हटले जात आहे.
आता पंढरपूर पंचायत समितीचा पुढचा सभापती कोण याची उत्सुकता तालुक्याला लागून राहिली असतानाच कासेगाव पंचायत समिती गणातून माजी सभापती वसंत देशमुख यांची लोकप्रियता आणि उमेदवार प्रमोद देशमुख यांचा मितभाषी स्वभाव,राजकारण विरहित प्रतिमा याच्या बळावर एकीकडे परिचारकांचा विरोध आणि दुसरीकडे स्व पक्षीयांनी सोडलेली साथ याच्यावर मात करीत कासेगाव गणातून पंचायत समिती गणातून प्रमोद देशमुख हे विजयी झाले.निवडणुकीचा निकाल लागला आणि दोन्ही प्रमुख आघाडीच्या नेत्यांची गोची झाली.आता भाजप आघाडी आणि राष्ट्रवादी आघाडी-तीर्थक्षेत्र आघाडीचे जरी ८ – ८ समान सदस्य विजयी झाले असले तरी वसंत देशमुख आणि प्रमोद देशमुख यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.एकीकडे पांडुरंग परिवार सोडलेल्या वसंत देशमुख यांना त्यांची राजकीय औकात दाखवून देण्याची तयारी केलेले परिचारक आणि दुसरीकडे आमदार अभिजित पाटील-भगीरथ भालकेंनी ऐनवेळी सोडलेली साथ यामुळे वसंत देशमुख व नूतन पंचायत समिती सदस्य प्रमोद देशमुख यांचा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे.अशावेळी पंढरपूर पंचायत समितीचा नूतन सभापती निवडताना प्रमोद देशमुख हे मतदान प्रकीयेवेळी अनुपस्थित राहातील अशीही शक्यता वर्तविली जात आहे.
दुसरीकडे प्रमोद देशमुख हे उपस्थित राहिले तर ईशवर चिट्ठी काढून सभापती पदाचा निर्णय होईल असेही म्हटले जात आहे.सोलापूर जिल्हाचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे पंढरपूर पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपचा सदस्य बसविण्यासाठी जोरदार फिल्डींग लावत असल्याची चर्चा आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी कल्याणराव काळे यांचे बंधू समाधान काळे आणि भोसेचे गणेश पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी परिचारक यांच्या परस्पर घेतला होता अशीच चर्चा झाली होती.आता यावेळीही पालकमंत्री वसंत देशमुख यांच्याशी संर्पक साधत ऐनवेळी चित्र बदलण्यात यशस्वी होणार का हे पहावे लागेल.तर दुसरीकडे आमदार समाधान आवताडे हेही पंढरपूर पंचायत समितीचा सभापती भाजपचा व्हावा यासाठी वसंत देशमुख आणि प्रमोद देशमुख यांचे सहकार्य लाभावे यासाठी पडद्याआडून महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याची चर्चा आहे.




