ताज्याघडामोडी

स्वेरीज् डी.फार्मसीचे यंदाही निकालात घवघवीत यश प्रथम वर्षात सिमरन खतीब प्रथम तर द्वितीय वर्षात अमृता वाघ प्रथम

पंढरपूरः गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित डिप्लोमा फार्मसी महाविद्यालयाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाल्याची माहिती फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार यांनी दिली. त्यामध्ये प्रथम वर्षात सिमरन युनुस खतीब तर द्वितीय वर्षात अमृता प्रकाश वाघ या विद्यार्थिनी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. डी. फार्मसी महाविद्यालयाने बोर्डाच्या परीक्षेतील यशाची परंपरा यावर्षी देखील जोपासली आहे. विशेष म्हणजे डी. फार्मसी निकालात  विद्यार्थिनींनी अव्वल  स्थान पटकावले आहे यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
       पंढरपूर परिसरातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिप्लोमा फार्मसीच्या शिक्षणासाठी यापूर्वी मुंबई, पुणे, सांगली, सोलापूर अशा मोठ-मोठया शहरात जावे लागत होते. वेळ व पैसा यांचा अपव्ययही होत होता. विद्यार्थ्यांची होणारी ही गैरसोय पाहून शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी. पी. रोंगे यांनी पंढरपूर पंचक्रोशीत फार्मसीचे महाविद्यालय सन २००६ साली उभे केले. याला  विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि त्यातून ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षण घेवू लागले. बऱ्याचदा अनेक जण प्रवेशासाठी इच्छुक असूनही केवळ मर्यादित प्रवेश संख्येमुळे त्यांना शिक्षण घेता येत नव्हते त्यामुळे पालकांची  अपेक्षा वाढली. पुन्हा स्वेरी अंतर्गत सन २०२१ पासून डी. फार्मसीचे दुसरे नवीन महाविद्यालय उभे केले. अशा प्रकारे डी. फार्मसीची दोन महाविद्यालये स्वेरी कॅम्पस मध्ये थाटात उभी  आहेत. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या डिप्लोमा फार्मसीच्या परीक्षेत द्वितीय वर्षामध्ये अमृता प्रकाश वाघ यांनी प्रथम (८५.१८ टक्के), प्रतिक्षा तानाजी जाधव यांनी द्वितीय (८४.२७ टक्के) व सुवर्णा उद्धव कोलते यांनी तृतीय क्रमांक (८३.७३ टक्के) मिळविला तसेच  प्रथम वर्षामध्ये सिमरन युनुस खतिब यांनी प्रथम (८०.०३ टक्के), साक्षी प्रकाश वाघ यांनी द्वितीय (८०.०० टक्के) व अश्विनी शशिकांत करणवार यांनी तृतीय क्रमांक (७७.०१ टक्के) मिळविला. यशस्वी विद्यार्थ्याना स्वेरीचे संस्थापक-सचिव डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व फार्मसी कॉलेजचे प्राचार्य मिथुन मणियार यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक-सचिव डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख यांच्यासह संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियार,  इतर महाविद्यालयांचे प्राचार्य आणि डिप्लोमा फार्मसीचे विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र कंदले, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *