Uncategorized

माढ्यातून रणजितसिंह मोहिते पाटील हेच शरद पवार यांचे उमेदवार ?

सोशल मीडियावर मोहिते पाटील समर्थक व्यक्त करू लागले भाकीत 

आ.रणजितसिंह मोहिते पाटील आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा तूर्तास तरी अफवा 
ट्विटर हॅन्डलवरील मोदींचा आणि कमळाचा फोटो आजही कायम

 

 

माढा लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाणार याची मोठी उत्सुकता जशी या मतदार संघातील महविकास आघाडीच्या समर्थकांना लागली आहे तशीच उत्सुकता अकलूजकर मोहिते पाटील समर्थकांना लागली आहे.आणि मोहिते पाटील काय निर्णय घेतात याची उत्सुकता तिकडे फलटणच्या रामराजे निंबाळकर समर्थकांना देखील लागली असल्याचे म्हटले जात आहे.माढा मतदार संघातून भाजपकडून यावेळी मोहिते पाटील यांनी उमेदवारीसाठी मोठा दावा केला होता.मागील लोकसभा निवडणुकीत दिलेल्या शब्दाप्रमाणे खासदार रणजितसिह निंबाळकर यांना लाखाचे मताधिक्य दिल्याने भाजपचे वरिष्ठ यावेळी मोहिते पाटील यांच्या उमेदवारीचा नक्की विचार करतील आणिमाढा लोकसभा मतदार संघातून मोहिते पाटील याना उमेदवारी देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

टेंभुर्णी येथे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारी बाबत मुलाखती घेतल्या असता विद्यमान खासदार व भाजपचे उमेदवार रणजितसिह निंबाळकर यांनी आपण उमेदवारीची मागणी केली नाही अशीच प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली होती.तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपण उमेदवारी मागितली असल्याचे म्हटले होते. मात्र तरीही भाजपकडून मोहिते पाटील यांच्या उमेदवारीचा विचार केला गेला नाही.या मागे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा मोहिते पाटील आणि अकलूज याचे वर्चस्व वाढेल अशी भीती असलेल्या महायुतीतील काही नेत्यांनी झारीतील शुक्राचार्याची भूमिका बजावली असल्याचीच भावना व्यक्त होताना दिसून आली.आता भाजप कडून खासदार निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.या विरोधात केवळ भाजपात असलेले मोहिते पाटील समर्थकच नव्हे तर अनेक पक्षात विखुरले गेलेले मोहिते पाटील समर्थक धैर्यशील मोहिते यांच्या गावभेट दौऱ्यात एकत्र येऊन मोहिते पाटील यांना जोरदार पाठींबा व्यक्त करताना दिसून येत आहेत.तर तिकडे भाजप आणि महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेतेही माढा मतदार संघातील असंतोषावर लक्ष ठेवून आहेत.

खासदार निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील धैर्यशील मोहिते पाटील हे गावभेट दौरे करीत आहेत.या गावभेट दौऱ्यात ते आपल्या सोबत असलेले विविध पक्षातील सर्मथक जो पर्यंत मोहिते पाटील परिवारावर निष्ठा व्यक्त करीत आहेत तो पर्यंत ऐकून घेतात मात्र जेव्हा सामान्य लोक भाजपवर अथवा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतील अशी शंका वाटते तेव्हा मात्र मीडियाला आपले कॅमेरे बंद ठेवण्यास सांगतात असाच  अनुभव नुकताच पंढरपूर तालुक्यातील त्यांच्या गावभेट दौऱ्यात अनेकांना आला आहे. तर मोहिते पाटील काही निर्णय घेणार का याची उत्सुकता फलटण तालुक्याचे रामराजे निंबाळकर समर्थक यांना लागून राहिली असल्याचे दिसून येत आहे.आणि त्याला कारणही तसेच आहे. मागील लोकसभा निवडणुकीत खासदार रणजितसिह निंबाळकर यांच्या विरोधात उघड भूमिका असलेले राष्ठ्रवादीचे रामराजे निंबाळकर आणि त्यांचे सर्मथक राष्ट्रवादी कॉग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदे यांना लीड देण्यात अपयशी ठरले होते.त्यामुळे मागील वेळी लाखाचे लीड दिलेले मोहिते पाटील यांनी घुमजाव केल्यास आपली गोची होईल या भीती पोटीच रामराजे निंबाळकर आणि त्यांचे समर्थक मोहिते पाटील यांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून असल्याची चर्चा आहे.

तर दुसरीकडे शरद पवार हे माढा मतदार संघातून लोकसभेच्या उमेदवार म्हणून धैर्यशील मोहिते पाटील या नावापेक्षा भाजपचे आमदार रणजितसिह मोहिते पाटील यांच्या नावासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे.दुसरीकडे भाजपने मोहिते पाटील यांची समजूत काढणे थांबवले असून लोकसभेला लाखाचे लीड दिल्याचे श्रेय घेणारे मोहिते पाटील हे विधानसभेला RAM सातपुते याना केवळ अडीच तीन हजार मतांनी विजयी करू शकले यातूनच या तालुक्यात मोहिते पाटील विरोधक तितकेच प्रबळ आहेत हे लक्षात घेत या तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांना आपल्या सोबत घेण्यासाठी व्यूहरचना करीत आहेत हेच दिसून आले आहे.

तर देवेंद्र फडणवीस यांनी रणजितसिह मोहिते पाटील यांच्या सोबत चर्चा करीत तुम्ही शरद पवार यांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवू इच्छित असाल तर भाजपने दिलेल्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्या असे स्पष्टपणे सुनावल्याची चर्चा आहे.यातूनच गुढी पाढव्याचा मुहूर्त साधत रणजीतीसिह मोहिते पाटील हे आपल्या आमदारकीचा राजीनामा देतील अशी शक्यता वर्तवली जात होती परंतु रामराजे निंबाळकर यांची भेट घेतल्यानंतरही रणजितसिह मोहिते पाटील यांच्या सोशल मीडिया हॅण्डलवरील रणजितसिह मोहिते पाटील यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतचा डीपी कायम असल्याने रणजीतसिह मोहिते पाटील हे शरद पवार यांच्याकडून लोकसभेची उमेदवारी घेणार अशी चर्चा सोशल मीडियावर होत असली तरी अजूनतरी भाजप सोबत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.मात्र 16 एप्रिल पर्यन्त मोहिते पाटील हे आपला निर्णय जाहीर करतील अशीच अपेक्षा मोहिते पाटील सर्मथक व्यक्त करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *