अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडाना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ – बदलापूर मार्गावरील एका ढाब्यासमोर घडली आहे. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करत पोलिसांनी मुख्य आरोपी बायकोसह तिचा प्रियकर आणि सुपारी घेऊन हत्या करणारे दोन मारेकरी गुंडाना असे चार जणांना अटक केली आहे. अटक आरोपींमध्ये तीन आरोपी दिल्लीत राहणारे असून सुपारी घेऊन हत्या करणारा एक आरोपी विधिसंघर्ष बालकअसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक रमेश झा (वय ४८) हे मूळचे दिल्लीचे असून ते अंबरनाथ एमआयडीसीमधील एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होते. ते अंबरनाथ पश्चिम भागातील सर्वेदयनगर परिसरात आरोपी बायको सुमनदेवीसह दोन मुलांसह राहत होते. २५ फेब्रुवारी रोजी रात्री सडे नऊ वाजल्याच्या सुमारास त्यांची अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ – बदलापूर मार्गावरील एका ढाब्या समोर भररस्त्यात कोणीतरी दोन अज्ञात मारेकऱ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची तक्रार २६ फेब्रुवारी रोजी मृतकचा २४ वर्षीय मुलाने अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिली.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी समांतर तपास सुरू केला असता, घटनास्थळावरून दोन इसम पळून जात असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असता, दोन्ही मारेकरी रिक्षात बसून दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये जातांना दिसले. त्यातच पोलिसांना तांत्रिक माहिती आणि बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी दिल्लीला पळून गेलेत पोलिसांनी तातडीने दिल्ली गाठत आरोपींना दिल्ली रेल्वे स्टेशनवर ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला.