गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लग्नाआधीचं प्रेम अन् घरच्यांचा दबाव, महिलेनं प्रियकरासोबत मिळून नवऱ्याला संपवलं

एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात आंधळी झालेली व्यक्ती कोणत्या थराला जाऊ शकते, याचं धक्कादायक उदाहरण उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये समोर आलं आहे. पोलिसांनी तिथे झालेल्या हत्याकांडाबाबत खळबळजनक खुलासा केला आहे. तीन दिवसांपूर्वी एका चाट विक्रेत्याचा खून झाला. पोलीस या प्रकरणातील आरोपीचा शोध घेत होते. हा आरोपी मृत व्यक्तीची पत्नीच असल्याचं उघड झालं आहे. मृत व्यक्तीच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे.

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कानपूरमधील सिकंदरा पोलीस स्टेशन हद्दीतील रसधन गावात घडली. 18 जानेवारी रोजी रात्री चाट विक्रेता दीपक गुप्ता (भुर्जी) याचा कोणीतरी बेदम मारहाण करून खून केला. दुसऱ्या दिवशी (19 जानेवारी) रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात येणाऱ्या-जाणाऱ्यांना दीपकचा मृतदेह पडलेला दिसला. त्याच्या कुटुंबियांनी म्हणण्यानुसार, त्याचा कोणाशीही वाद नव्हता. त्यामुळे त्याचा खून का झाला, या बाबत कोणताही अंदाज लावता येत नव्हता. यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांना दीपकच्या पत्नीचा संशय आला. त्यांनी तिचा मोबाईल क्रमांक सर्व्हिलन्सवर ठेवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दीपक गुप्ताची पत्नी कामिनी उर्फ मालती हिच्या मोबाईलवर एका व्यक्तीचे अनेक कॉल येत होते. रेकॉर्ड तपासलं असता 18 जानेवारी रोजी त्यांच्यात अनेकदा बोलणं झालं होतं. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी कामिनीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. तिची कसून चौकशी केली असता तिने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.

कामिनीने सांगितलं की, तिने प्रियकर रवीसोबत (रा. औरैया) मिळून दीपकचा खून केला. घटनेच्या रात्री दीपक चाट विकून घरी येत होता. यादरम्यान आरोपींनी पाठीमागून हातोड्याने वार करून त्याचा खून केला आणि मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. गुन्हा केल्यानंतर कामिनी घरी आली तर तिचा प्रियकर तेथून पळून गेला.

अतिरिक्त एसपी राजेश कुमार पांडे यांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, मृताची पत्नी कामिनी हिचे लग्नाच्या अगोदरपासून रवीशी प्रेमसंबंध होते. तिला रवीशी लग्न करायचं होतं. मात्र, घरच्यांच्या दबावामुळे तिला सहा महिन्यांपूर्वी दीपकशी लग्न करावं लागलं. दरम्यान, त्याची पत्नी सतत तिच्या प्रियकराशी फोनवर बोलत असल्याचं दीपकला समजलं. त्याने तिला विरोध केला. पण, तिने आपलं प्रेमप्रकरण बंद केलं नाही. या प्रकराणामुळे रवीही संतापला होता. दोघांनी मिळून दीपकच्या खूनाचा कट रचला. खून केल्यानंतर त्यांनी हा मृत्यू अपघात असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. पण, त्या ते अयशस्वी झाले. पोलिसांनी अवघ्या 48 तासांत या प्रकरणाचा छडा लावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *