पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये ग्रामीण भागातील मूलभूत सोयी सुविधा करण्यासाठी सन २०२३-२४ या आर्थिक वर्षामध्ये २५१५ – १२३८ या योजनेअंतर्गत ग्रामविकास व पंचायत राज विकास विभागाकडून विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली असता मतदारसंघातील कामांसाठी शासन अध्यादेशाद्वारे ५ कोटीनिधीला मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
आमदार आवताडे यांनी सांगितले आहे की, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील विविध विकास कामांसाठी निधीची मागणी केली होती. सदर मागणीला राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री ना.चंद्रकांतदादा पाटील, ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांचे माध्यमातून हा निधी मंजूर झाला असून या निधीतून ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये सभामंडप बांधणे, तालीम बांधणे, रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करणे, ग्रामपंचायत कार्यालय बांधणे, स्मशानभूमी बांधणे,रस्ता खडीकरण व मुरमीकरण करणे,सामाजिक सभागृह बांधणे, भूमिगत गटार बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे इत्यादी विकास कामे मार्गी लागणार आहेत.
सदर सर्व कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार असून नियोजित कामांचा आराखडा तयार करून लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देण्यात यावे अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. तसेच आपल्या गावातील मंजूर कामे सुरळीत व वेळेवर मार्गी लावण्यासाठी स्थानिक पातळीवरील राजकारण आड न आणता संबंधित ग्रामपंचायतींनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आमदार जनसंपर्क कार्यालय पंढरपूर व मंगळवेढा येथे सादर करावीत असे आवाहन जनसंपर्क कार्यालय यांचेकडून करण्यात आले आहे.