साताऱ्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. जिल्ह्यातील हिवरे (ता. कोरेगाव) येथे इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाचा गळा आवळून खून केला आहे. विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ (१२) असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना कुंभारकी येथील उसाच्या शेतात घडली. विक्रम याचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचे गूढ मात्र अद्याप उघडलेले नाही.
वाठार स्टेशन पोलीस आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. २३ डिसेंबर रोजी विक्रम आणि त्याचे आई-वडील हिवरे येथील कुंभारकी नावाच्या शिवारात त्यांचे उसाचे क्षेत्र आहे. या शेतामध्ये जनावरांना चारा आणण्यासाठी ते गेले होते. दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान विक्रमची आई चारा घेऊन घरी गेली. एक ते दीड तासानंतर विक्रम आणि त्याचे वडील घराच्या दिशेने जात असताना विक्रमाची चप्पल शेतात राहिल्याचे विक्रमच्या लक्षात आले. त्या वेळी त्याने वडिलांना सांगून चप्पल आणण्यासाठी पुन्हा शेतात आला. तोपर्यंत त्याचे वडील चालत चालत घरी पोहोचले होते. मुलगा घरी आला नसल्याने त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर आईने संपूर्ण गावात त्याचा शोध घेतला. मात्र, यावेळी तो मिळून न आल्याने सायंकाळी ७ वाजता गावातील नितीन खताळ यांना कल्पना दिली.
खताळ यांनी तात्काळ ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे फोन करून गावातील लोकांना विक्रम बेपत्ता असल्याचे सांगितले. सुरक्षा यंत्रणेवर आलेल्या फोनमुळे गावातील सर्व ग्रामस्थ आणि युवक एकत्र आले. यावेळी परिसरात बिबट्याची दहशत असल्याने त्या अनुषंगाने जमलेल्या सर्व लोकांनी कवडेवाडी आणि कुंभारकी शिवारात विक्रमची शोधशोध सुरू केली. तरीही तो मिळून आला नाही. त्यानंतर काही युवकांनी त्यांच्या कुंभारकी येथील उसाच्या शेतात प्रत्येक सरित शिरून त्याचा शोध घेतला असता एका सरीत उसाच्या पाचोट्याने झाकून ठेवलेला विक्रमचा मृतदेह सापडला.
या घटनेचे माहिती वाठार पोलिसांना मिळताच वाठार स्टेशनचे पोलीस, श्वान पथक, ठसे तज्ञ, तपास यंत्रणा, कोरेगाव पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र शेळके घटनास्थळी हजर झाले. ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. यावेळी विक्रम याचा गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेची फिर्याद विजय आनंदराव खताळ (३६) यांनी वाठार स्टेशन पोलिसात दिली आहे. वाठार पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले करत आहेत. विक्रमचा गळा आवळून खून करण्यात आला. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला याचे गूढ मात्र अद्याप उघडलेले नाही. मात्र, हिवरे गावात तणावपूर्ण शांतता आहे. या खुनाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी पथक नेमले असून तपास सुरू केला आहे.