पती-पत्नीत भांडणं होणं हे काही नवीन नाही. काही वेळा वाद विकोपालाही जातात; मात्र अलीकडच्या काळात पती-पत्नीतल्या वादांनी टोक गाठल्यावर एकमेकांचा जीव घेण्यासही मागे-पुढे पाहिलं जात नसल्याच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशात आग्र्यात घडली आहे. त्यात एका महिलेने आपल्या पतीला विजेचा शॉक देऊन मारल्याचा आरोप आहे.
आग्र्यात एका महिलेने आपल्या पतीची कथितरीत्या विजेचा शॉक देऊन हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पतीची हत्या केल्यानंतर तिने दोन दिवसांपर्यंत त्याचा मृतदेह घरातच ठेवल्याचा आरोप असून, त्यानंतर दुर्गंध येऊ लागल्यावर तिने पोलिसांना हत्येची माहिती दिली.
आरोपी महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नीरज कुशवाह याला दारूचं व्यसन होतं. दारू पिऊन तो दररोज पत्नी प्रीतीला त्रास देत असे. त्याला कंटाळून अखेर प्रीतीने नीरजच्या पायाला विजेची तार बांधली आणि त्याला शॉक दिला.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, की विजेचा शॉक लागल्याने नीरजचा मृत्यू झाला आहे. आरोपी महिलेने कथितरीत्या दोन दिवसांपर्यंत मृतदेह खोलीतच ठेवला होता. सोमवारी (18 डिसेंबर) मृतदेहाचा दुर्गंध येऊ लागल्यानंतर प्रीतीने खोलीला कुलूप लावलं आणि चावी घेऊन ती पोलीस ठाण्यात गेली. तिथे जाऊन तिने सांगितलं, की तिने तिच्या पतीची हत्या केली आहे.