ताज्याघडामोडी

घरात कुणी नसताना आत शिरला, संपत्तीच्या वादातून दिरानेच वहिनीला संपवलं; कसं घडलं हत्याकांड?

संपत्तीच्या वादातून एका कुटूंबातील विधवा महिलेची हत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक गावात समोर आलीये. या प्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत. काल गुरुवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. विधवा महिलेच्या दीरानं ही हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सुनंदा कैलास गवई (वय ५०) असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून बाबाराव बोंदर गवई (वय ५९) असं मारेकरी दिराचं नाव आहे. हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. आरोपीला पकडण्यासाठी चान्नी पोलिसांनी लागलीच पथके तयार करून अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या.

अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यात असलेलं दिग्रस बुद्रुक गाव. इथे कैलास गवई यांचं कुटुंब अनेक वर्षापासून वास्तव्यास आहे. कैलास यांच्या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनंदा यांच्या खांद्यावर आली. सुनंदा यांना दोन मुली आणि एक मुलगा असून तो सैनिक दलात कार्यरत आहे. तर दोन्ही मुलींचे लग्न झाले असून त्यातील एक मुलगी अनेक दिवसांपासून आपल्या आईकडे तिच्या मुलीसह माहेरी राहत आहे. दरम्यान, सुनंदा गवई यांच्या नावाने गावात एक छोटसं घर असून ते कधीकाळी शेतमजूर म्हणून कामाला जायचे. अशाप्रकारे त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालायचा. सर्व सुरळीत असतानाच गवळी कुटुंबात गेल्या काही दिवसांपासून वाद होऊ लागला. हा वाद होता संपत्तीचा. सुनंदा गवई यांचा दीर म्हणजेच कैलास यांचा छोटा भाऊ (बाबाराव) हा त्यांच्या घरात हिस्सा मागत होता. परंतु आपल्या घरात हिस्सा द्यायला सुनंदा यांचा स्पष्ट नकार होता. त्यामुळे या कारणांवरून त्यांच्यामध्ये कित्येकदा वाद झाला.

दरम्यान, बाबाराव बोंदर गवई लहानपणापासूनच मुंबईला राहत आहे. दिग्रस बुद्रुक गावात त्यांचे नातेवाईक असल्याने नेहमी त्यांचे येणे-जाणे असायचे. आता गावात येतो म्हटलं तर राहायचा प्रश्न होता. यासाठी त्यांनी वहिनी सुनंदा यांच्या नावानं असलेल्या घरात हिस्सा मागितला. परंतु वहिनी हिस्सा द्यायला नकार द्यायची.

काल गुरुवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास सुनंदा गवई आणि त्यांची मुलगी घरात होती. सुनंदा यांची नात बाहेर खेळायला गेली असता तिला शोधण्यासाठी तिची आई घराबाहेर गेली. मुलगी आणि नात घरी परतले असता, आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला आणि टाहो फोडला. घटनास्थळी उपस्थित मृताच्या नातेवाईकांनी सांगितले की, मृत सुनंदा यांच्या पतीचे लहान भाऊ बाबाराव गवई (दिर) यांच्याशी मालमत्तेतील वाट्यावरुन वाद होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *