ताज्याघडामोडी

“पक्षाचं नाव आणि चिन्ह अजूनही उद्धव ठाकरेंना मिळू शकतं”, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाचं सूचक विधान

शिवसेनेत फूट पडून जवळपास दीड वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्याप शिवसेनेतील सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे. १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निर्णय दिला आहे. संबंधित निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्देशानंतरही विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. यामुळे ठाकरे गटाचे नेते सुनील प्रभु यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.

दुसरीकडे, ‘शिवसेना’ पक्षनाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्हावरही आज सुनावणी होणार आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांसाठी ही दोन्ही प्रकरणं अत्यंत महत्त्वाची आहेत. या सर्व घडामोडीनंतर सर्वोच्च न्यायलयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी सूचक विधान केलं आहे. उद्धव ठाकरे यांना अजूनही पक्षनाव आणि चिन्ह मिळू शकतं, असं सूचक विधान वकील सिद्धार्थ शिंदे यांनी केलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.

शिवसेनेतील सत्तासंघर्षावर भाष्य करताना वकील सिद्धार्थ शिंदे म्हणाले, “फेब्रुवारी महिन्यात निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात जाणं अपेक्षित होतं, पण ते थेट सर्वोच्च न्यायालयात आले. न्यायालयाने त्यांची दखल घेतली पण निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही.”

“आता त्यावरील कार्यवाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या विरुद्धही निर्णय देऊ शकतं. अजूनही पक्ष आणि पक्षचिन्ह उद्धव ठाकरेंना मिळू शकतं. यावर सर्वोच्च न्यायालय विश्लेषण करून निर्णय देईल. पण हे प्रकरण कधी ऐकलं जाईल? आणि कधी निर्णय येईल? याची वेळ मर्यादा आपल्याला सांगता येणार नाही”, अशी सूचक प्रतिक्रिया सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *