गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सावकाराच्या जाचामुळे महिलेची रेल्वेखाली आत्महत्या

कसारा रेल्वे मार्गावरील शहाड ते आंबिवली दरम्यान रेल्वे रुळावर एक 46 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. कल्याण लोहमार्ग पोलिसांना ही आत्महत्या असल्याचं आढळून आलं असून, या महिलेनं चार दिवसांपूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात एका सावकरांकडून होणाऱ्या छळाची तक्रार केली होती. तर दुसऱ्या घटनेत कसारा इथं एका प्रेमीयुगुलानंही घरातील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केली. या दोन्ही घटनांप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करून कल्याण लोहमार्ग पोलीस आणि कसारा पोलीस पथकानं तपास सुरू केला आहे.

कल्याण रेल्वे पोलिसांना गुरुवारी रात्री 8.30 च्या सुमारास आंबवली आणि शहाड स्थानकादरम्यान मालगाडीनं एका महिलेला धडक दिल्याचा फोन आला होता. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस पथक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. खळबळजनक बाब म्हणजे महिलेच्या मृतदेहाजवळून पोलिसांना सावकाराविरुद्ध केलेल्या तक्रारीची प्रत सापडली. ही महिला शहाड येथील रहिवासी असून तिला दोन मुलं आहेत. या महिलेचा पती कपड्याच्या दुकानात कामगार आहेत.

मालगाडीच्या धडकेत या महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती या घटनेचा तपास करणाऱ्या पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी दिली. मृत महिलेनं चार दिवसांपूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात एका सावकाराविरोधात तक्रार दाखल केली होती. या सावकाराकडून दोन वर्षांपूर्वी या महिलेनं लाखो रुपये कर्ज घेतलं होतं. ते कर्ज फेडण्यासाठी सावकार छळ करत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. महिलेचा मृत्यू झाल्यावर त्या तक्रारीची प्रत रेल्वे पोलिसांना मिळाली आहे. मात्र मृताच्या कुटुंबीयांनी कोणाच्याही विरोधात तक्रार न केल्यामुळे आम्ही अपघाती मृत्यूची नोंद कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात केल्याचं पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *